
नवी दिल्ली: भारताला २१ जुलै रोजी नवा राष्ट्रपती मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलै रोजी संपत आहे, त्यामुळे देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा संपुर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या हालचाली देशात सुरु झाल्या आहेत. आज विरोधी पक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार पडत आहे. यावेळी युपीएचा उमेदवार कोण हे जाहीर होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या विरोधात एक मजबूत उमेदवार विरोधी पक्ष देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत आपली राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही हे सांगितले होते. तरीही देशातील बडे नेते शरद पवारांनीच ही निवडणूक लढवावी अशी मागणी आजच्या बैठकीत करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन बिगर भाजपशासीत राज्यातील पक्षांना आज दिल्लीत एकत्र केले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यासाठी लागणारी पुरेशी मतदारांची संख्या विरोधाकांकडे नाहीये. तरीही विरोधक निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. नेमकं या निवडणुकीचं गणित कसं आहे ते जाणून घेऊया.
संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये एकून २४५ सदस्य असतात. त्यापैकी २३३ सदस्यच मतदान करु शकतात. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेल्या काश्मीरच्या कोट्यातील चार खासदारांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत २२९ सदस्यच मतदान करणार आहेत.
लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेमध्ये ५४३ सदस्य आहेत. ते सर्वच्या सर्व मतदान करणार आहेत. ज्याठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे, तिथलेही खासदार मतदान करु शकतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फक्त राज्यातील विधानसभेतील आमदाराच मतदान करु शकतात. विधान परिषदेतील आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करत नाही. देशातील सर्व विधानसभा आमदारांची संख्या ४ हजार ३३ आहे, त्यामुळे एकून मतदारांची संख्या ३ हजार ८०९ एकढी आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रत्येक मताचे मुल्य हे वेगवेगळे असते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभेच्या आमदारांच्या मतांचे मुल्य एकत्रित केल्यास त्याचे एकूण मुल्य १० लाख ८६ हजार ४३१ एवढी आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक विजयी होण्यासाठी अर्धापेक्षा जास्त मतं पडावी लागतात म्हणजेच राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला ५ लाख ४३ हजार, २१६ मतांची गरज आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या युपीएकडे एकूण २ लाख ५९ हजार ८९२ मते आहेत. तसेच टीएमसी, सपा, वायएसआर, आप, बीजेडी यासारख्या इतर पक्षांकडे २ लाख ९२ हजार ८९४ मते आहेत. या सर्व विरोधी गटांच्या मतांची बेरीज केली तर ती होते ५ लाख ५२ हजार ७८६ म्हणजे याची मतांची टक्केवारी होते ५१ टक्के. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठी रंगतदार निवडणूक होण्याची शक्यता आहे.
एनडीएच्या नेतृत्वाखालील २० पक्षांच्या आमदारांच्या मतांचा विचार केला तर एनडीएकडे एकूण ५ लाख ३५ हजार मते आहेत. यात भाजपच्या सर्व सहयोगी पक्षांचा समावेश आहे. युपीए आणि एनडीएच्या मतांचा विचार केला तर एनडीएला १३ हजार मतांची गरज भासणार आहे. एनडीए आणि मित्र पक्षांच्या मतांची टक्केवारी ४८ टक्के आहे. युपीएतील पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी जर पाठिंबा दिला तर सरकारला ही निवडणूक जड जाऊ शकते. विरोधकांकडे भाजपपेक्षा २ टक्के मतं जास्त आहेत. आपली मते फुटू नयेत म्हणून युपीए आणि मित्र पक्ष मजबूत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ओडिशातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दल आणि आंध्रातील वायएसआर काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. बीजेडीकडे 31 हजारापेक्षा अधिक मूल्य असलेली मतं आहेत. तर जगन मोहन रेड्डींकडे 43 हजाराहून अधिक मूल्य असलेली मते आहेत. अशावेळी कोणत्याही पक्षाने जर भाजपला पाठिंबा दिला तर एनडीए सहज विजयी होईल. मात्र, ही मते विरोधकांकडे वळल्यास भाजपच्या उमेदवाराचा विजय कठिण होणार हे निश्चित आहे.