मुंबई : शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर राज्यातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. विश्वसनीय सुत्रांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काँग्रेसचे तब्बल 7 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, आणि ते लवकरच काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. यात एका माजी मुख्यमंत्र्यांसह 4 माजी मंत्र्यांच्या समावेश आहे. यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे.
याच दरम्यान काल (शुक्रवारी) संध्याकाळी वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे अशोक चव्हाण यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, मी पुढील आठवड्यात भारत जोडो यात्रेसाठी दिल्लीला जाणार आहे. तसेच भाजपमध्ये जाणार असल्याच्या संपूर्ण चर्चांना कोणतेही अर्थ नाहीत. या चर्चा पूर्णपणे तत्थहिन आहेत.
अशोक चव्हाणांची भाजपशी वाढती जवळीक :
मागील काही काळातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास अशोक चव्हाण भाजपच्या जवळ जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच अशोक चव्हाणांसह 9 काँग्रेस आमदार हे शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीलाही सभागृहात अनुपस्थित होते. याशिवाय जूनमधील विधानपरिषद मतदानालाही ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे संशयाची सुई व्यक्त करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार :
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल एका महिन्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यावेळी पुढील विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार काँग्रेस आमदारांच्या प्रवेशानंतर होणार असल्याची माहिती मिळत आहे.