PUNE: 'डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना आर्थिक मदत करणार नाही', पुनीत बालन यांची मोठी घोषणा
Punit Balan: जी गणपती मंडळं गणेशोत्सवात डिजेचा वापर करतील त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करणार नाही. अशी थेट भूमिका उद्योजक पुनित बालन यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून अवघ्या जगाचे आकर्षण झाला आहे. हा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि धार्मिक व आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला पाहिजे, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी घेतली आहे.
‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्य पूजन कार्यक्रमात बालन बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बालन यांनी याबाबत भाष्य केलं.
हे ही वाचा>> Ganeshotsav 2022 : पुणे जिल्ह्यातील मोरगावात गणपती का बसवत नाहीत?
पाहा पुनित बालन नेमकं काय म्हणाले?
ते म्हणाले की, ‘‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 132 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत जनतेने एकत्र येऊन लढा देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला.''
''स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते. यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे, हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही.''










