भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक, हॉटेल व्यावसायिकाचा दुर्देवी मृत्यू
भाजप खासदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

रोहित वाळके, अहिल्यानगर: भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्याविरोधात पोलिसात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर धस याच्या गाडीने पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे 7 जुलै रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात नितीन प्रकाश शेळके (वय 34) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. ही धडक भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या एम.जी. ग्लॉस्टर कारने (MH 23 BG 2929) दिली.
हे ही वाचा>> मर्सिडीज उलटली, 9 एअर बॅग उघडल्या, तरी बड्या उद्योजकाचा मृत्यू; समृद्धीवर भीषण अपघात
नितीन शेळके हे मोटारसायकलवरून यु-टर्न घेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या सागर धस यांच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सुपा पोलीस ठाण्यात सागर धस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मृत नितीन शेळके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विशेष म्हणजे त्यांच्या वडील व चुलत्याचाही याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला होता.









