शिंदे-फडणवीस यांनी ठाकरेंसोबत व्यासपीठावर एकत्र येणं टाळलं? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

निमंत्रण स्वीकारल्यास ठाकरे-पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस एकत्र येणार!
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath shinde
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath shindeMumbai Tak

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारले आहे. याबाबतचे वृत्त 'सकाळ' वृत्तपत्राने दिले आहे. छगन भुजबळ १५ ऑक्टोबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. यानिमित्त गुरुवारी (१३ ऑक्टोबर) रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृतमहोत्सवी सोहळा पार पडणार आहे. सोबत सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती छगन भुजबळ गौरव समितीचे निमंत्रक प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना दिली.

या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान आणि विजय सावंत लिखित छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसंच भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ७५ निवडक छायाचित्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे, अशीही माहिती आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस जोडीनं हे निमंत्रण राजकीय कारणांमुळे नाकारलं आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. सध्या शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वाद, ठाकरे गटाचे भाजप आणि भाजपमधील नेत्यांशी असलेले वाद, भाजप-शिंदेंचे ठाकरे-राष्ट्रवादीशी ताणलेले संबंध तसंच याच कार्यक्रमाला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याने शिंदे-फडणवीस यांनी त्यांच्या समोर येण्यासाठी हे निमंत्रण नाकारलं का? असे अनेक सवाल उपस्थित होतं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in