संभाजीराजे छत्रपती संतप्त : आक्रमक होत 'झी स्टुडिओ'ला दिला गंभीर परिणामांचा इशारा

संभाजीराजेंनी झी स्टुडिओला का दिला इशारा? नेमकं काय कारण? वाचा सविस्तर
Sambhajiraje Chhtrapati
Sambhajiraje ChhtrapatiMumbai Tak

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि चित्रपटांमध्ये दाखविण्यात आलेल्या विविध दृश्यांमुळे वातावरण तापलं आहे. याविरोधात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रायगडवरुन एका आंदोलनाची सुरुवात केली असून ते मुंबईमध्ये आझाद मैदानातही आंदोलन करणार आहेत. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. हर हर महादेव या चित्रपटाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओला पत्र लिहून गंभीर इशारा दिला आहे.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. ते म्हणाले, हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.

इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडिओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

तर अजिबात सहन करणार नाही :

हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाची बाब म्हटली पाहिजे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणं सोडलं तर अनेक ऐतिहासिक सिनेमा आले आहेत.

मात्र असे काही सिनेमा इतिहासाची मोडतोड करून काढले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत देखील अशीच इतिहासाची मोडतोड करून सिनेमा काढले गेले तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते आणि सिनेमात सादर केलं जातं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांबाबत आणि मावळ्यांबाबत आम्ही हे मुळीच सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

का होतोय विरोध?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते, हर हर महादेव सिनेमात चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. तर वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात छत्रपती शिवरायांचे जे दाखवण्यात आले ते काय मावळे आहेत का? पोस्टवरून ते मावळे वाटतात का? पगडी काढलेली दाखवण्यात आली आहे तो शोकसंदेश असतो. हा आपला इतिहास आहे, असही त्यांनी सांगितलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in