एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची; फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा मोठा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्यांचं नाव घेत राऊतांनी आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत न छापल्याच्या कारणावरून राऊतांनी मंगेशकर कुटुंबियांनाही सुनावलं आहे.

संजय राऊत रोखठोकमध्ये लिहितात, “२४ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मोदी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला आले. पंतप्रधान मुंबईत, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नावच त्या निमंत्रण पत्रिकेवर नाही. हा महाराष्ट्राचाच अपमान.”

“लता मंगेशकर महाराष्ट्राच्या, त्यांना जाऊन चार महिने झाले नाहीत. त्यांच्या कुटुंबानं त्यांच्या नावानं पुरस्कार दिला तो मोदींना पंतप्रधान म्हणून. त्यांचंही कर्तव्य होतं ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निमंत्रितांत नाहीत काय?’’ असं आयोजकांना विचारण्याचं. पण तसं घडले नाही. कारण महाराष्ट्राशिवाय देशाचं राजकारण सुरू झाले आहे आणि मराठी नेते काँग्रेस काळात नव्हते त्यापेक्षा जास्त दिल्लीचे गुलाम झाले आहेत. आजच्या महाराष्ट्र दिनी या स्थितीची खंत कोणाला वाटेल काय?,” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

“औद्योगिक महाराष्ट्रानं देशासमोर आदर्श ठेवला. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचं मूळ मुंबईच्या आर्थिक शक्तीत आहे. या शक्तीवरच आता केंद्रानं घाव घालायला सुरुवात केली व महाराष्ट्राच्या मोठेपणाचा मुकुट खाली उतरवला. मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जागतिक स्तरावरचे नेते मुंबईत येत नाहीत. त्यांना आधी गुजरातला व मग दिल्लीत नेले जाते,” असं म्हणत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“इतक्या वर्षांनंतरही मुंबई कोणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती भारताची आहे. पण आधी ती महाराष्ट्राची आहे म्हणून भारताची आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थानं आजही पूर्णपणे संपलेली नाहीत. आधी मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे व एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळ्यांची पूर्ण कल्पना आहे,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी फडणवीसांवर केला आहे.

“फडणवीस यांनी मुंबईत जे अमराठी पंचक निर्माण केलं आहे, त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी करता येईल याचं एक ‘प्रेझेंटेशन’ तयार करून गृह मंत्रालयास सादर केलं. ‘विक्रांत’ घोटाळ्यातील आरोपी व त्यांच्या अमराठी बिल्डर साथीदारांकडं त्या मोहिमेची सूत्रं आहेत. एका बाजूला आपण महाराष्ट्र दिन साजरा करायचा व त्याच वेळी महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत हालचालींना वेग यावा, हे बरं नाही,” असंही राऊतांनी म्हटलं आहे.

“यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांनी बहुजन समाजाला प्रतिष्ठा देणारेच राजकारण केलं. त्या बहुजन समाजानंच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत प्रत्येक वेळी झोकून दिलं. तो बहुजन समाजही आता तत्त्वहीन झाल्यासारखा भरकटला असं चित्र दिसतं. महाराष्ट्राला कमजोर करणारा हा प्रकार आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत व मुंबईच्या लढाईत त्याग करण्यासाठी मुंबईतील कष्टकरी म्हणजे बहुजन समाजच उतरला.”

ADVERTISEMENT

“मुंबईतील कष्टकरी आज कमजोर झाला व धनिक, श्रीमंतांच्या हातात मुंबईची सूत्रे गेली. अंबानींना मागे टाकून श्रीमंतीचा मुकुट आज गौतम अदानी यांच्या डोक्यावर विराजमान झाला आहे. जगातले पाचवे श्रीमंत म्हणून त्यांचा लौकिक आज आहे. त्या मुकुटातील अनेक पिसे मुंबई-महाराष्ट्राची आहेत. पण महाराष्ट्राच्या हाती या सगळ्यांतून काय लागलं?,” असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT