“अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण…”; शिवसेनेने (UBT) चढवला हल्ला
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवरून ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखातून काही सवाल केले असून, भाजप आणि त्यांचे नेते एक नंबरचे नौटंकीबाज लोक आहेत, असं टीकास्त्र डागलं आहे. झालं असं की तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून अकोल्यातील खारपट्टी भागात […]
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवरून ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखातून काही सवाल केले असून, भाजप आणि त्यांचे नेते एक नंबरचे नौटंकीबाज लोक आहेत, असं टीकास्त्र डागलं आहे.
झालं असं की तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून अकोल्यातील खारपट्टी भागात येणाऱ्या 69 गावांना पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. मात्र, हे आरक्षण शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले. सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे आक्रमक झाले आणि त्यांनी अमरावती ते नागपूर अशी संघर्ष पदयात्रा काढली होती.
नागपूरजवळ पोहोचल्यानंतर आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना पोलिसांनी अटक केली. या पोलिसी कारवाईवरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून टीका केली आहे.
नौटंकीबाज लोक, फडणवीसांना टोला
अग्रलेखात म्हटलं आहे की, “भारतीय जनता पक्ष व त्यांचे पुढारी एक नंबरचे नौटंकीबाज लोक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा एक फोटो स्वतःच प्रसिद्ध केला. टेबलावर फायलींचा ढिगारा असून ‘मिशन नो पेंडन्सी’च्या नावाखाली देवेंद्र महोदय फायली क्लीअर करताना त्या छायाचित्रात दिसत आहेत. वास्तविक कामाचा डोंगर मंत्रालयात साचला आहे आणि देवेंद्र त्या डोंगरावर आक्रमण करीत आहेत हे खरेच आहे, पण त्या फायली नक्की कोणाच्या आहेत? रोजगार, पाणी, शेतकरी यांच्याबाबत त्या फायली आहेत काय?”










