प्रकाश आंबेडकरांसाठी डाव टाकला, पण उद्धव ठाकरेंचे पत्ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकत्र येण्याच्या जोरात सुरूये... ठाकरे-आंबेडकरही सकारात्मक दिसतोहत, पण शिवसेनेच्या मित्रपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे...
shiv sena vanchit bahujan aghadi alliance possibility
shiv sena vanchit bahujan aghadi alliance possibility

'देश गुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहणार असू, तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही.' प्रकाश आंबेडकरांसमोर उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानांची महाराष्ट्रात खूप चर्चा होतेय. ठाकरेंनी आंबेडकरांना शिवशक्ती-भीमशक्ती युतीसाठी खुली ऑफर दिल्याचं या विधानावरून म्हटलं जातंय. पण शिवशक्ती, भीमशक्ती युतीसाठी ठाकरेंनी डाव टाकला असला तरी त्याचे पत्ते मात्र त्यांच्या हातात नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या हातात पत्ते आहेत.

ठाकरेंना आंबेडकर सोबत का हवेत, शिवशक्ती-भीमशक्ती युतीचा डाव काय आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या हातात नेमके कोणते पत्ते आहेत, त्यावरच आपण नजर टाकणार आहोत.

आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभरणीत बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी अतुलनीय असं योगदान दिलं. जात, धर्मव्यवस्थेविरोधात लढताना दोघांच्या भूमिका एकमेकांना पूरक राहिल्या. नंतर आंबेडकर, ठाकरेंचे वारसदारही राजकारणात उतरले. पण त्यांच्या भूमिका दोन टोकावर असायच्या. याच पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर २०२२ ला प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिन महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक गोष्ट घडली.

बाबासाहेब आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरेंचे पणतू एका मंचावर आले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसले. एकमेकांच्या सुरात सूर मिसळत बोलले. ठाकरे तर निव्वळ बोललेच नाही, तर एकत्र काम करण्याची भावनाही उघडपणे बोलून दाखवली.

shiv sena vanchit bahujan aghadi alliance possibility
'न्यायमूर्तींनी आंधळे असू नये'! ठाकरेंनी सरन्यायाधीशांना करून दिली सत्ता संघर्षाच्या निकालाची आठवण

ठाकरेंची ही भावना म्हणजेच शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याची ऑफर असल्याचं म्हटलं जातंय. पण ठाकरेंनी ऑफर दिली, असली तरी या डावातले जे पत्ते आहेत, ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात आहेत. ते कसं तेच आता आपण बघूयात.

पहिला पत्ता आहे, मविआचा प्रयोग

२०१९ मध्ये सरकार स्थापनेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग साकारला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन हा प्रयोग साकारला. जून २०२२ मध्ये ठाकरेंना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं, तरी मविआचा डाव काही मोडला नाही. तिन्ही पक्ष अजूनही भाजप-शिंदे गटाविरुद्ध एकत्रितपणे लढत आहेत. राहुल गांधींच्या विधानावर संजय राऊत मविआ फुटू शकते, असं म्हणाले. म्हणजेच मविआ सध्याही अस्तित्वात आहे. त्यामुळे मविआत कोणाला घ्यायचं, कोणाला नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचा आहे. ती एकाच्या अखत्यारितली गोष्ट नाही. म्हणजेच ठाकरेंना एकत्र यावं वाटतंय म्हणून एकत्र येता येत नाही.

आणि इथे एका गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे. ती म्हणजे, शिवसेनेच्या ४० आमदार आणि १३ खासदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची सोबत नको म्हणून थेट ठाकरेंविरोधात बंड केलं. तरीही ठाकरेंनी मविआशी फारकत घेतली नाही. आणि शिवसेनेतल्या अभूतपूर्व फाटाफुटीत ठाकरेंसाठी मविआमध्ये राहणं हेच बेरजेचं राजकारण असल्याचं जाणकार सांगतात.

दुसरा पत्ता आहे, काँग्रेस-एनसीपी आणि आंबेडकरांमधला समान धागा

निवडणुकीच्या राजकारणात मराठा, दलित, मुस्लिम, आदिवासी समाज काँग्रेस, राष्ट्रवादीचे पाठिराखे म्हणून ओळखले जातात. ठाकरेंना शिवसेनेतल्या फुटीनंतर हेच पाठिराखे खुनावत आहेत. त्यांना आपलंस करण्याचे प्रयत्न ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदावर असल्यापासून सुरू आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून ठाकरेंनी आंबेडकरांना ऑफर दिल्याचंही जाणकार सांगतात. पण ठाकरेंचा हा डाव तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्या सोबत येतील.

मग काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत येण्यात अडचण आहे का? या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला आंबेडकरांची अडचण आहे.

काँग्रेसला अडचण काय, तर प्रकाश आंबेडकर सातत्याने काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांविरोध बोलतात. राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'वरही त्यांनी सडकून टीका केली. एवढंच नाही, तर लातूरकर, नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असा गौप्यस्फोटही आंबेडकरांनी नुकताच केला होता. लातूरकर, नांदेडकर म्हणजे, देशमुख आणि चव्हाण फुटतील, असा दावा त्यांनी केला. आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा, विधानसभेला अनेक जागांवर पक्षाला फटका बसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो.

दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणात पवारविरोध हा एक महत्त्वाचा फॅक्टर राहिलाय. पवार आणि आंबेडकर हे दोन ध्रुव राहिलेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांचं राजकारण हे मराठाकेंद्री राहिलंय. तर आंबेडकरांचं राजकारण दलितकेंद्री आहे. आणि गावखेड्यात आजही या दोन समाजघटकांमध्ये फारसं सख्य नसल्याचं वेळोवेळच्या घटनांवरून समोर येतं. त्यामुळे पवार, आंबेडकरांना सोबत यायचं ठरवलं तरी त्यांचे पाठिराखे मतपेटीत एकत्र येणार का, ही यातली खरी मेख आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडे असलेल्या याच दोन पत्त्यांमुळे ठाकरेंचा आंबेडकरांना सोबत घेण्याचा डाव लगेच साकार होताना दिसत नाहीत. पण यातून एक मध्यम मार्गही निघू शकतो. आणि ठाकरेंसाठी हीच जमेची बाब आहे. मुंबई महापालिकेच्या राजकारणात विरोधी पक्षांमध्ये ठाकरे, काँग्रेस आणि आंबेडकरांचा म्हणजेच आंबेडकरी चळवळीचा प्रभाव आहे. राष्ट्रवादीची तेवढी ताकद नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला ठाकरेंकडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोडून आंबेडकरांना सोबत घेत बीएमसी निवडणूक लढवण्याचा पर्यायही विचारात घेतला जाऊ शकतो. पण ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीची तात्पुरती सोबत सोडण्याची रिस्क घेणार का, हा खरा प्रश्न आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in