शिवसेनेच्या परंपरागत कार्यालयावर शिंदे गटाचा दावा मान्य; ठाकरे गट एक पाऊल मागे

Shivsena : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या परंपरागत पक्ष कार्यालयाचा ताबा शिवसेना (ठाकरे गट) घेतला होता.
Uddhav thackeray Vs Eknath shinde
Uddhav thackeray Vs Eknath shindeMumbai Tak

नागपूर : येथील विधानसभेतील शिवसेनेचं परंपरागत विधिमंडळ पक्ष कार्यालय अखेर शिंदे गटाला मिळालं आहे. विधिमंडळात शिवसेनेचे गटनेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेनेचं जुनं विधिमंडळ पक्ष कार्यालय देण्यात आलं आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बैरक नंबर पाच आणि सहामध्ये नवं विधिमंडळ कार्यालय देण्यात आलं आहे.

रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या परंपरागत पक्ष कार्यालयाचा ताबा शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने घेतला होता. इथे त्यांचे काही कर्मचारीही बसले होते. मात्र कार्यालयाबाहेरील फलकावर 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह झाकून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे अधिवेशन काळात हे पक्ष कार्यालय नेमकं कोणाला मिळतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र अखेर आज या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाला देण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना शिवसेना (ठाकरे गट) मुख्य प्रतोद सुनील प्रभू म्हणाले की, आम्हाला कामचं करायचे आहे. त्यामुळे कुठलाही वाद निर्माण करण्याची गरज वाटत नाही. त्यानंतर पक्ष कार्यालयातील ठाकरे गटाच्या कर्मचाऱ्यांना आणि आमदारांना हे पक्ष कार्यालय सोडावं लागलं.

शिंदे गटाने कालचं तयार केले होते फलक :

शिंदे गटाने काल संध्याकाळीच नाम फलक तयार करुन घेतले होते. यात 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गटनेता शिवसेना पक्ष' असा उल्लेख असलेला फलक होता. त्यासोबत प्रताप सरनाईक, अनिल बाबर, संजय शिरसाट, संजय रायमुलकर या आमदारांचे प्रतोद पदाचे फलकही तयार करुन घेण्यात आले आहेत. 

मुंबईतील कार्यालय कोणाकडे?

दुसरीकडे मुंबईतील शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयावरुनही सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे कार्यालय सील करण्यात आलं होतं. पण नंतर वाद टाळण्यासाठी शिंदे गटाकडून दावा केला गेला नाही. त्यामुळे सध्या ते कार्यालय ठाकरे गटाकडेच आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in