‘एक बिहारी सबपर भारी’ शिंदेंच्या नेत्याने उठवून दिलं रान, राजकीय रणकंदन सुरू!
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते अरविंद मोरे यांच्या ‘एक बिहारी सबपर भारी’ वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. ठाकरे गटाचे विजय साळवी यांनी टीका केली असून काँग्रेसनेही या वादात उडी घेत भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.
ADVERTISEMENT

कल्याण: छठपूजेच्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केलेल्या ‘एक बिहारी सबपर भारी’ या वक्तव्यावरून कल्याणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची गरज असल्याचे विधान अरविंद मोरे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. तर अरविंद मोरे यांनीही आपल्या वक्तव्याचे समर्थन करत ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या वादात काँग्रेसनेही उडी घेत भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.
ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदेंच्या अरविंद मोरेंना टोला
विजय साळवी यांनी अरविंद मोरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, बिहारी नागरिक महाराष्ट्रात नव्हते तेव्हाही राज्यात उद्योगधंदे सुरू होते, असे म्हटले आहे. मराठी माणूस आणि ठाकरे कुटुंबाची विचारसरणी विसरू नका, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे या वक्तव्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर : पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, लवकरच येणार प्रीपेड टॅक्सी
दुसरीकडे, विजय साळवी यांच्या टीकेला उत्तर देताना अरविंद मोरे यांनी कोरोना काळातील परिस्थितीचा दाखला दिला. कोरोना काळात उत्तर भारतीय नागरिक आपल्या गावी परतल्यामुळे उद्योगधंदे बंद पडले होते, असे त्यांनी म्हटले. त्यावेळी आई, बहीण, काका आणि पत्नीला भेटण्यासाठीही आपण गेलेलो नव्हतो, असा उल्लेख करत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच ‘जिथे बेरीज, तिथे अरविंद मोरे’ असे म्हणत ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले.
'ना बिहारी भारी, ना गुजराती भारी’, ठाकरे-शिंदे वादात काँग्रेसची उडी
या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. कल्याण युवक काँग्रेसचे अध्यक्ष जपजीत सिंग यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्र ही भाजप किंवा शिंदे गटाची खासगी मालमत्ता नाही, असे सुनावत त्यांनी ‘ना बिहारी भारी, ना गुजराती भारी; महाराष्ट्राच्या अस्मितेपुढे सर्व समान अधिकारी’ अशी भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कल्याणमधील राजकीय वादात आणखी भर पडली आहे.
हे ही वाचा>> जिल्हा बँकेच्या सत्तेत भाजप बाहेर? शिवेंद्रराजेंनी सांगितली पडद्यामागची संपूर्ण कहाणी
एकीकडे मराठी अस्मिता, दुसरीकडे उत्तर भारतीयांचे योगदान आणि त्यावरून सुरू झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप, यामुळे छठपूजेच्या व्यासपीठावरून सुरू झालेला ‘एक बिहारी सबपर भारी’चा वाद आता कल्याणच्या राजकारणात चांगलाच गाजू लागला आहे.
