Vikram Sampath: वीर सावरकर आणि गुरूजी गोळवलकर यांच्यात टोकाचे मतभेद होते पण…

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आली होती त्यावेळी बिरसा मुंडा यांचं कौतुक करताना राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केली. वीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि ते इंग्रजांकडून पेन्शनही घेत होते या आशयाचं वक्तव्य केलं. तसंच त्यांच्यावर टीका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचं पत्रही दाखवलं होतं. यानंतर भाजपकडून पंडित नेहरूंवर टीका सुरू झाली.

दुसरीकडे वीर सावरकरांना संघाची भूमिका मान्य नव्हती अशीही टीका झाली. या सगळ्यावर प्रकाश टाकला आहे सुप्रसिद्ध इतिहासकार विक्रम संपत यांनी. साहित्य आज तक या कार्यक्रमात मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी विक्रम संपत यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

साहिल जोशी- RSS आणि वीर सावरकर यांचे परस्पर संबंध हे कधीही चांगले नव्हते अशी टीका वारंवार होते. वीर सावरकर यांचं हे म्हणणं होतं की आपल्याला राजकीय पक्ष म्हणून पुढे आलं पाहिजे. हिंदू महासभेला RSS ने पाठिंबा द्यावा. मात्र यासाठी गुरूजी गोळवलकर कधीच तयार झाले नाहीत. ज्यावेळी पक्ष स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा गोळवकर गुरूजींनी हिंदू महासभेला निवडलं नाही तर त्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींना सोबत घेऊन जनसंघ स्थापन केला. हे कशाचं द्योतक आहे ? RSS ने वीर सावरकरांचं हिंदुत्व कधी स्वीकारलं नाही का? अनेक वर्षे वीर सावरकरांना आरएसएसने स्वीकारलं नाही आजची स्थिती अशी आहे की वीर सावरकर हे भाजपसाठी हिंदुत्वाचे आयकॉन आहेत. याबाबत काय सांगाल असं विचारण्यात आलं तेव्हा विक्रम संपत यांनी सविस्तर उत्तर दिलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विक्रम संपत: मला असं वाटत नाही की संघाने वीर सावरकरांना नाकारलं होतं किंवा स्वीकारलं नव्हतं. गोळवलकर गुरूजी आणि वीर सावरकर यांच्यात खूप मतभेद होते. वीर सावरकरांनी त्यांच्या खास खोचक शैलीत असं म्हटलं होतं की RSS स्वयंसेवकाची जर समाधी बांधली तर त्यावर लिहिलं जाईल की या स्वयंसेवकाने आयुष्यात काय कमावलं तर फक्त तीन गोष्टी… तो जन्मला, त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भाग घेतला आणि त्याचा मृत्यू झाला या तीनच ओळी असतील. एक प्रकारे त्यांनी ही संघाची खिल्लीच उडवली होती. त्यामुळे गुरूजी गोळवलकर आणि वीर सावरकर यांच्यात टोकाचे मतभेद होते.

हैदराबादमध्ये हिंदू महासभेने मोठी चळवळ उभी केली होती

हैदराबादमध्ये हिंदू महासभेने मोठी चळवळ उभी केली होती. तिथे होणाऱ्या हिंदूंवर जे अत्याचार होत होते त्यांना हिंदू महासभेने वाचा फोडली होती. नागरिकांचे हक्क डावलले जात होते. रझाकारांनीही खूप अन्याय केले. त्यावेळी अशा लोकांसाठी वीर सावरकरांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून खूप काम केलं. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यात उतरावं ही वीर सावरकर यांची इच्छा होती. मात्र गुरूजी गोळवलकर यांनी या गोष्टीला विरोध दर्शवला.

ADVERTISEMENT

गुरूजी गोळवलकर यांचा वीर सावरकर यांचा विरोध

आम्ही सांस्कृतिक संस्था आहोत आम्ही राजकारणात पडणार नाही हे गुरूजींनी सांगितलं. तसंच हिंदू महासभेने सैनात सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला होता त्याचाही मोठ्या प्रमाणावर विरोध त्यावेळी संघाने केला होता. त्यामुळे वीर सावरकर आणि गुरूजी गोळवलकर यांच्यात मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण झाले होते. मात्र मला वाटत नाही की वीर सावरकर यांना आरएसएसने कधीही नाकारलं नाही. वीर सावरकर त्यांना प्रातःस्मरणीय होते.

ADVERTISEMENT

हिंदुत्वाच्या त्या काळात विविध व्याख्या होत्या. आपण त्या सगळ्याला एक रंग देऊ इच्छितो. मात्र वीर सावरकर हे संघाला कधीही नको होते असं नव्हतं. असं सविस्तर उत्तर विक्रम संपथ यांनी दिलं आहे. वीर सावरकर हे लेखक होते, कवी होते, नाटककार होते. आत्ता जे काही त्यांच्याविषयी सुरू आहे ते दुर्दैवी आहे.

इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत गौरवोद्गार

वीर सावरकर यांचा १९६६ मध्ये मृत्यू झाला तेव्हा देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी वीर सावरकरांबाबत गौरवोद्गार काढले होते. ब्रिटिशांशी लढताना वीर सावरकर यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं या आशयाचं इंदिरा गांधी बोलल्या होत्या. त्यांच्या धैर्य आणि देशभक्तीसाठी त्यांना ओळखलं जाईल असंही इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. मग पंतप्रधानपदी बसलेल्या इंदिरा गांधींना माहित नव्हतं का? की वीर सावरकर हे माफीवीर होते किंवा इंग्रजांकडून पेन्शन घेत होते ती टीका त्यांच्यावर आज केली जाते आहे, जे दुर्दैवी आहे असंही विक्रम संपत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT