भारत आणि जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या सिझनचं ऑक्शन चेन्नईत पार पडलं. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सने २० लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलंय. तब्बल ८ तास चाललेल्या लिलावात अर्जुन तेंडुलकरचं नाव सर्वात शेवटी घेण्यात आलं. यावेळी मुंबईने त्याला तात्काळ आपल्या संघात दाखल करुन घेतलं.
याव्यतिरीक्त संपूर्ण ऑक्शनवर परदेशी खेळाडूंनी वर्चस्व राखलं. पहिल्या सेशनमध्ये ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस यासारख्या, मोईन अली यासारख्या प्लेअर्ससाठी संघांमध्ये चढाओढ होताना दिसली. १४ कोटी २५ लाख रुपये मोजत RCB ने मॅक्सवेलला आपल्या संघात दाखल करुन घेतलं तर राजस्थान रॉयल्सने मॉरिसवर १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावली.
दुसऱ्या सेशनमध्ये मुंबई इंडियन्सने न्यूझीलंडच्या Adam Milne साठी ३ कोटी २० लाख रुपये मोजत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं. यानंतर राजस्थान रॉयल्सने बांगलादेशच्या मुस्तफिजूर रेहमानसाठी १ कोटी रुपये मोजले. यानंतर मुंबईने गेल्या हंगामात आपल्याच संघातील कुल्टर-नाईलसाठी तब्बल ५ कोटी रुपये मोजत त्याला आपल्या संघात घेतलं. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या झाय रिचर्डसनसाठी संघांमध्ये पुन्हा चढाओढ दिसली. ज्यात पंजाबने १४ कोटी रुपये मोजत रिचर्डसनला आपल्या संघात दाखल करुन घेतलं. याचसोबत पंजाबने शाहरुख खान या तामिळनाडूच्या प्लेअरसाठीही ५ कोटी २५ लाख रुपये मोजले. कृष्णप्पा गौथमवरही चेन्नई सुपरकिंग्जने ९ कोटी २५ लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं.
यानंतर अखेरच्या सत्रात सर्व संघानी भारतीय प्लेअर्सना घेण्याचा सपाटा लावला. पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या केदार जाधवला सनराईजर्स हैदराबादने, हरभजन सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने, सॅम बिलींग्जला दिल्ली कॅपिटल्स संघाने, मुजीब उर रेहमानला १ कोटी ५० लाखांच्या बोलीवर हैदराबादने विकत घेतलं. याचसोबत न्यूझीलंडच्या काएल जेमिन्सननेही १५ कोटींची बोली घेत सर्वांना चकीत केलं. RCB ने जेमिन्सनसाठी १५ कोटी रुपये मोजले. याचसोबत टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारासाठी CSK ने ५० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल केलंय.