इंग्लंडच्या आगामी भारत दौऱ्यादरम्यान बीसीसीआय अहमदाबाद येथील मोटेरा मैदान आणि पुण्यात फॅन्सला मॅच पाहण्याची संधी मिळेल का याची चाचपणी करत आहे. ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडच्या संघाचा भारत दौरा सुरु होतोय. या सिरीजमध्ये दोन्ही संघ ४ टेस्ट, ५ टी-२० आणि ३ वन-डे मॅच खेळणार आहेत. या सिरीजमधील पहिल्या दोन टेस्ट मॅच या चेन्नईत तर उर्वरित दोन टेस्ट आणि टी-२० मॅचची सिरीज अहमदाबादला खेळवण्यात येणार आहेत. तर ३ वन-डे मॅचची सिरीज बीसीसीआय पुण्यात खेळवणार आहे.
पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी ५० टक्के प्रेक्षकांना संधी द्यावी अशी विनंती बीसीसीआयने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनला केली होती. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने ही विनंती फेटाळून लावली आहे. त्यामुळे अहमदाबाद आणि पुणे येथे फॅन्सला सामना पाहण्याची संधी मिळावी यासाठी बीसीसीआय संबंधित क्रिकेट संघटनांशी चर्चा करत असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली.
मोटेरा मैदानाचं नुतनीकरण झाल्यानंतर बीसीसीआय पहिल्यांदाच या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन करत आहे. एक लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक एकाच वेळी या मैदानावर सामना पाहू शकतात. जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान असा विक्रम आता मोटेरा मैदानाच्या नावावर जमा झाला आहे.