ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाने धडाकेबाज खेळी करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. विराट कोहलीची माघार आणि इतर प्रमुख खेळाडूंना झालेली दुखापत अशा खडतर परिस्थितीतही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. विशेषकरुन शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर यासारख्या तरुणांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उतलला. शुभमन गिलने अखेरच्या दोन टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्मासोबत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. टीम इंडियाचा माजी ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीरने शुभमनच्या इनिंगचं कौतुक केलं असून त्याच्यावर जास्त दडपण आणू नका असा सल्ला दिला आहे.
“गिलने इंग्लंड सिरीजमध्ये रोहित शर्मासोबत ओपनिंगला यायला हवं यात काही शंकाच नाही, पण लगेच निष्कर्षावर यायला नको. आपण एखाद्याला लगेचच इतक्या वरच्या जागेवर बढती देऊ शकत नाही. शुभमन गिल टॅलेंटेड खेळाडू आहे पण त्याला अजून बराच संयम दाखवण्याची गरज आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोपं नाहीये. आंतरराष्ट्रीय करिअरच्या सुरुवातीलाच त्याने चांगली सुरुवात केली आहे. एखाद्या खेळाडूसाठी यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. ऑस्ट्रेलियात खेळताना तुम्ही तुमच्या खेळीच्या जोरावर संघाला जिंकवून दिलंत ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. गिलला थोडा वेळ द्यायला हवा, त्याच्यावर दडपण टाकता कमा नये.” गंभीर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर बोलत होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लडविरोधात सिरीज खेळण्याची सज्ज झाला आहे. ५ फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार असून पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी शुभमन गिलची भारतीय संघात निवड झाली आहे.