अहमदाबाद: अहमदाबाद भारत आणि इंग्लंडमध्ये चार टेस्ट मॅचच्या सीरीजमधील तिसरी मॅच उद्यापासून (24 फेब्रुवारी) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमध्ये होणारी ही मॅच डे-नाइट असणार आहे. भारतीय टीमची ही आतापर्यंतची तिसरी डे-नाईट टेस्ट मॅच आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत 2 डे-नाईट टेस्ट मॅच खेळल्या आहेत. पहिली डे-नाईट टेस्ट मॅच ही 2019 साली कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये खेळविण्यात आली होती. ही मॅच भारताने एक इनिंग आणि 46 रन्सने जिंकली होती.
यानंतर टीम इंडियाने परदेशात पहिल्यांदा पिंक बॉल टेस्ट मॅच खेळली होती. ज्यामध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला होता. ही मॅच मागील वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेडमध्ये खेळविण्यात आली होती. या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये अवघ्या 36 रन्सवर ऑलआऊट झाली होती. टेस्ट मॅचच्या इतिहासात भारताचा हा निच्चांकी स्कोअर आहे.
त्यामुळे जर आपण डे-नाइट टेस्ट मॅचचा भारताचा रेकॉर्ड पाहिल्यास 50-50 असाच आहे. कारण एका मॅचमध्ये भारताला विजय मिळाला तर एका मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण घरच्या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड हा 100 टक्के आहे. अशावेळी आता हे पाहावं लागणार आहे की, इंग्लंडविरुद्धच्या डे-नाइट मॅचनंतर देखील हा रेकॉर्ड कायम राहतो का?
ही देखील बातमी पाहा: होय, मी देखील नैराश्याचा सामना केलाय ! विराट कोहलीने दिली कबुली
डे-नाईट टेस्ट मॅचमधील टीम इंडियाचा यशस्वी बॅट्समन कोण?
कॅप्टन विराट कोहली हा डे-नाइट टेस्ट मॅचमध्ये आतापर्यंत भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने शानदार सेंच्युरी झळकावली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडिलेड टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये त्याने 74 रन्सची खेळी केली होती. कोहलीने 2 डे-नाइट टेस्टमध्ये 214 रन्स केले आहेत. बांगलादेशविरुद्ध 2019 मध्ये कोहलीने जी सेंच्युरी झळकावली होती ती त्याची टेस्ट मॅचमधील शेवटची सेंच्युरी आहे. त्यानंतर अद्याप तरी तो सेंच्युरी करु शकलेला नाही.
डे-नाईट टेस्ट मॅचमधील टीम इंडियाचा यशस्वी बॉलर कोण?
दुसरीकडे बॉलर्सचा विचार केल्यास इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी बांगलादेशविरुद्धच्या डे-नाइट टेस्ट मॅचमध्ये 5-5 विकेट घेतले होते. इशांतने या मॅचमध्ये 9 विकेट घेतले होते तर उमेशला 8 विकेटला मिळाल्या होत्या. डे-नाइट टेस्टमध्ये आतापर्यंत उमेश यादवच्या नावावर 11 विकेट जमा आहेत. तर इशांतच्या 9 विकेट्स आहेत. दरम्यान, तिसऱ्या डे-नाईट मॅचमध्ये टीम इंडियाचा कोणता बॅट्समन आणि बॉलर कशी कामगिरी करतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.