Personal Finance Tips for SIP Date: म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग मानला जातो. मात्र, SIP सुरू करताना किंवा नंतर अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की, महिन्याची SIP तारीख बदलल्याने परतावा वाढतो का?
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर अनेकदा 'महिन्याच्या सुरुवातीला SIP करा', 'पगारानंतर लगेच SIP करा', किंवा 'महिन्याच्या शेवटी SIP केल्यास जास्त युनिट्स मिळतात' असे विविध दावे केले जातात. पण प्रत्यक्षात या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
SIP ची तारीख परतावा ठरवत नाही
म्युच्युअल फंडातील SIP मध्ये प्रत्येक हप्त्याच्या दिवशी त्या दिवसाच्या Net Asset Value (NAV) नुसार युनिट्स खरेदी होतात. बाजार वर असेल तर कमी युनिट्स मिळतात आणि बाजार खाली असेल तर जास्त युनिट्स मिळतात. यालाच रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग (Rupee Cost Averaging) म्हणतात.
यामुळे महिन्याच्या 1, 5, 10, 15 किंवा 25 तारखेला SIP असली तरी दीर्घकालीन म्हणजे 10 ते 20 वर्षांच्या कालावधीत परताव्यामध्ये मोठा फरक पडत नाही. बाजारातील चढ-उतार कालांतराने सरासरी होत जातात.
मग तारीख बदलण्याचा फायदा कधी होऊ शकतो?
SIP ची तारीख बदलल्याने गुंतवणुकीचा परतावा नव्हे, तर आर्थिक शिस्त सुधारू शकते.
- पगार मिळाल्यानंतर लगेच SIP असल्यास पैसे खर्च होण्यापूर्वीच गुंतवणूक होते.
- बँक खात्यात पुरेशी शिल्लक असल्यामुळे SIP फेल होण्याची शक्यता कमी होते.
- ECS किंवा Auto Debit वेळेवर पूर्ण होतो.
- गुंतवणुकीत सातत्य राहते.
म्हणूनच आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने अनेक तज्ज्ञ 'Pay Yourself First' या तत्त्वानुसार पगारानंतर लगेच SIP ठेवण्याचा सल्ला देतात.
प्रत्येक महिन्यात वेगळी तारीख निवडण्याचा काही फायदा आहे का?
काही गुंतवणूकदार बाजाराची दिशा ओळखून SIP ची तारीख वारंवार बदलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बाजारातील अल्पकालीन चढ-उताराचा अचूक अंदाज लावणं जवळपास अशक्य असतं. त्यामुळे केवळ बाजाराचा अंदाज घेऊन SIP ची तारीख बदलणं हा प्रभावी गुंतवणूक धोरणाचा भाग मानला जात नाही.
SIP फेल होण्याचे नुकसान
जर खात्यात पैसे नसल्यामुळे SIP हप्ता वळता आला नाही, तर त्या महिन्यातील गुंतवणूक चुकते. यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. काही बँका अशा व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्कही आकारू शकतात. त्यामुळे योग्य तारीख निवडण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे हप्ता वेळेवर जाणं हे आहे.
ADVERTISEMENT












