Nagpur Crime : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (अमली पदार्थ विरोधी) पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. बुधवारी (1 जुलै) मध्यरात्री सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध 'हॉटेल हेरिटेज' येथे सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी 36 पुरुष, 9 महिला, हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 49 जणांना ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे शहरात अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
मध्यरात्रीच सर्च ऑपरेशन
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल हेरिटेजमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवले जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांना मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आधी स्वतः हॉटेलमध्ये जाऊन परिस्थितीची रेकॉर्ड केली. त्यानंतर पोलीस उपायुक्तांच्या सूचनेवरून बुधवारी रात्री साडेबारापासून ते गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत हे विशेष सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.
हे ही वाचा : मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाई दरम्यान पोलिसांनी हॉटेल मालक गुरप्रीत सिंग खंडूजा, हॉटेल मॅनेजर संजय चिंचखेडे आणि तिथे कार्यरत असलेले वेटर यांच्यासह उपस्थित ग्राहकांवर कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 23 हजार रुपये किमतीचे 13 हुक्का पॉट्स आणि हुक्का ओढण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले. या संपूर्ण मोहिमेत वेगवेगळ्या कारवाई दरम्यान एकूण 3 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : पदवीधरांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती, एक लाखाहून अधिक पगार
पोलिसांनी दिला इशारा
या प्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, घटनास्थळी संशयास्पद अमली पदार्थांचा वापर झाला आहे का, हे तपासण्यासाठी ड्रग टेस्टिंग किटच्या साहाय्याने नमुने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शहरात अशा प्रकारच्या कोणत्याही अवैध आणि अंमली पदार्थांशी संबंधित प्रकारांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ADVERTISEMENT












