इस्लाम धर्म स्वीकार, गर्लफ्रेंडचा धर्मांतरासाठी दबाव, सांगलीतील तरुणाची आत्महत्या

Sangli Crime News : सांगलीतील 19 वर्षीय दुर्वांक शेवालेच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी धर्मांतराच्या दबावाचे आरोप केले आहेत.. न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.

Sangli Crime News

Sangli Crime News

मुंबई तक

02 Jul 2026 (अपडेटेड: 02 Jul 2026, 01:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इस्लाम धर्म स्वीकार, गर्लफ्रेंडचा धर्मांतरासाठी दबाव

point

तरुणाचा टोकाचा निर्णय

Sangli Crime News : सांगलीतील खणभाग परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय दुर्वांक शेवाले या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दुर्वांक पुण्यातील एका कंपनीत काम करत होता. आत्महत्येनंतर शहर पोलिसांनी आवश्यक पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया पूर्ण करून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पुढील तपासासाठी पोलिसांनी दुर्वांकचा मोबाईल जप्त केला होता. मात्र, सुरुवातीला मोबाईलमध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याचे पोलिसांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी दुर्वांक सांगलीत आल्यानंतर अधूनमधून वापरत असलेला त्याच्या आईचा मोबाईल तपासला. त्या मोबाईलमधील चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : "रिअ‍ॅलिटी त्यांनाही माहितीये अन् मलाही..", शिंदेंच्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर फडणवीस स्पष्टच बोलले

"समू, मी आत्महत्या करत आहे," दुर्वांकचा तो व्हिडीओ पोलिसांना सापडला 

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दुर्वांकचे कोल्हापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि अधूनमधून सांगलीत नातेवाईकांकडे येणाऱ्या एका मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणी त्याच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असल्याचे चॅटमधून दिसून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी चार्जिंगसाठी दुर्वांकचा मोबाईल कुटुंबीयांकडे परत दिल्यानंतर तो तपासला असता आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड करण्यात आलेला एक व्हिडीओ त्यामध्ये आढळल्याचा दावा करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये दुर्वांक "समू, मी आत्महत्या करत आहे," असे म्हणताना ऐकू येत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये काहीही आढळले नसल्याचा पोलिसांचा दावा आणि नंतर मिळालेला व्हिडीओ यामुळे तपासाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : 'दिल्लीने स्पष्ट सांगितलंय छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच..', शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य

धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप

कुटुंबीयांनी आईच्या मोबाईलमधील चॅटचे प्रिंटआउट आणि दुर्वांकच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ पोलिसांकडे सुपूर्द केल्याचा दावा केला आहे. मात्र, तपासात विलंब होत असल्याची त्यांची तक्रार आहे. हे प्रकरण एका महिला अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आले असून त्या रजेवर असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले. त्यामुळे इतक्या संवेदनशील प्रकरणाचा तपास रजेवर असलेल्या अधिकाऱ्याकडे कसा सोपवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, कुटुंबीयांनी सर्व पुरावे दिल्यानंतरही संशयित साहिल बागवान आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप असलेल्या तरुणीला सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी हस्तक्षेप करून पोलिसांना जाब विचारल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला आणि साहिल बागवानला ताब्यात घेण्यात आल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित तरुणीला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही किंवा चौकशीसाठी बोलावण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत कुटुंबीयांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. हत्या प्रकरणांमध्ये आरोपींना अल्पावधीत ताब्यात घेतले जाते, मग धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात तपास इतका संथ का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तपासासाठी पोलिसांनी दुर्वांकचा मोबाईल जप्त केला, मात्र संबंधित तरुणीचा मोबाईल जप्त करण्यात किंवा तिला ताब्यात घेण्यात अद्याप यश आले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर कोणाची भूमिका आहे का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दुर्वांकच्या आई-वडिलांनी न्यायाची मागणी करत, अन्य कोणत्याही तरुणावर अशी वेळ येऊ नये, अशी भावना व्यक्त केली आहे. न्याय मिळाला नाही तर पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, तरुणीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही तिला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नसल्याने तिच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच ती अल्पवयीन असल्यास तिला बालसुधारगृहात पाठवावे, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे माजी आमदार व प्रदेशाध्यक्ष नितीन राजे शिंदे यांनी केली आहे.