Ketan Agrawal murder case : पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलत आरोपी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राइम रिक्रिएशन केले. सकाळी सुमारे 8 वाजता लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चेतनला घटनास्थळी नेले आणि सुमारे अडीच तास ही प्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेनंतर चेतनला पुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं मोठं संकट, 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
डमी पुतळा घेऊन घटनेचं रिक्रिएशन
क्राइम रिक्रिएशनदरम्यान पोलिसांनी केतनच्या वजनाइतकाच एक डमी पुतळा सोबत नेला होता. चेतनने या डमीला सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत ढकलून घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यात आले. या प्रक्रियेद्वारे केतनला अंतिम धक्का नेमका कोणी दिला, याचा तपास पोलिस करत आहेत. केतन आणि सिया यांच्या मागून चेतन कसा चालत होता, त्यानंतर नेमका घटनाक्रम कसा घडला, हे पोलिसांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
चेतनकडूनही स्वतंत्रपणे रिक्रिएशन
यापूर्वी आरोपी सिया गोयलचाही घटनास्थळी क्राइम रिक्रिएशन करण्यात आला होता. आता चेतनकडूनही स्वतंत्रपणे रिक्रिएशन करून दोघांच्या कथनातील फरक तपासण्यावर पोलिसांचा भर आहे. सिया आणि चेतन यांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यास नेमका घटनाक्रम उघड होण्यास मदत होईल, असा तपास यंत्रणेला विश्वास आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे तपासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाने दुसऱ्यांदा 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान पोलिसांना असेही समोर आले आहे की, लग्नापूर्वी सिया आणि केतन यांनी इंडोनेशियातील बाली येथे जाण्याचा बेत आखला होता. मात्र 6 जून रोजी हा दौरा रद्द झाला होता. त्यानंतर केतनने आपल्या वडिलांना सिया छोट्या-छोट्या कारणांवरून वाद घालत असल्याचे सांगितले होते. त्यावर वडिलांनी सिया वयाने लहान असल्याने तिच्याशी बोलून समुपदेशन करण्याचा प्रयत्न करू, असे केतनला सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
ADVERTISEMENT











