Crime News : बेंगलोरमधील एका डेकेअर सेंटरमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या निष्पाप मुलांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या चिमुकल्यांना रडल्याची शिक्षा म्हणून त्यांचा अमानुष छळ करण्यात आला आहे. फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी 'कॅपजेमिनी'च्या बेंगलोर येथील कॅम्पसमध्ये चालवल्या जाणाऱ्या डेकेअर सेंटरमधील काही विचलित करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या व्हिडिओंमध्ये रडणाऱ्या चिमुरड्यांना शांत करण्यासाठी त्यांना थेट फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये बळजबरीने बसवणे, वेस्टर्न टॉयलेटवर बसवून त्यांच्या तोंडात वॉटर जेट स्प्रेने पाणी मारणे आणि त्यांना बाथरुममध्ये कोंडून ठेवणे अशा अघोरी पद्धतींचा वापर केल्याचे दिसून येत आहे. या क्रूरतेच्या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप आणि सर्वत्र प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT
मुलांना गप्प बसवण्यासाठी क्रूर छळ
या धक्कादायक प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तातडीने पाच महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. हे डेकेअर सेंटर थेट कॅपजेमिनी कंपनीकडून चालवले जात होते की कंपनीच्या आवारात इतर कुठल्या बाह्य सेवा पुरवठादार संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) चालवले जात होते, याबाबत पोलीस सध्या पडताळणी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आपले आई-वडील कामावर गेलेले असताना डेकेअर सेंटरमध्ये राहिलेल्या या लहान मुलांना धमकावण्यासाठी आणि गप्प बसवण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांकडून हा क्रूर छळ केला जात होता. पोलिसांनी आता तक्रारदार पालक, डेकेअर सेंटरचे कर्मचारी आणि इतर प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, जनजीवन विस्कळीत, हाय टाइडचा इशारा
पाच महिला कर्मचाऱ्यांचा समावेश
बेंगलोर सिटीचे पोलीस आयुक्त श्रीमंत कुमार सिंग यांनी या घटनेला अत्यंत गंभीर मानले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एका वरिष्ठ महिला पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, तक्रारीत पाच महिला कर्मचाऱ्यांची नावे असून सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि पुराव्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा : भाचीला पुजाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, मामाने मध्यरात्री काय केलं?
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
दुसरीकडे, या संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल 'कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगा'नेही घेतली आहे. एका याचिकेद्वारे या प्रकरणात आयोगाच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली असून, आयोग आता संबंधित अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल मागवणार आहे. तसेच या छळ प्रकरणाची स्वतंत्र चौकशीही केली जाण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस डेकेअर सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासह घटनेचा अचूक घटनाक्रम निश्चित करण्याचे काम करत आहेत. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पुढील कायदेशीर पावले उचलली जात आहेत.
ADVERTISEMENT











