Personal Finance Silver ETF: चांदीमध्ये गुंतवणूक करायची म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चांदीची नाणी, विटा किंवा दागिने येतात. मात्र, प्रत्यक्ष चांदी खरेदी न करताही तिच्या किमतीतील चढ-उतारांशी जोडलेल्या गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाला सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड (Silver ETF) असं म्हणतात. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून चालणाऱ्या या गुंतवणुकीत चांदी साठवून ठेवण्याची किंवा तिच्या शुद्धतेची काळजी घेण्याची गरज नसते. मात्र, चांदीच्या किमती घसरल्यास गुंतवणुकीत नुकसानही होऊ शकतं.
ADVERTISEMENT
Silver ETF म्हणजे नेमकं काय?
Silver ETF हा चांदीच्या देशांतर्गत किमतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणारा फंड आहे. या फंडाच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रत्यक्ष चांदीमध्ये गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदारांना या फंडाचे युनिट्स शेअर बाजारातून खरेदी-विक्री करता येतात. ही युनिट्स गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात जमा होतात.
शेअर बाजारातून चांदीत गुंतवणूक कशी करायची?
- डिमॅट आणि ट्रेडिंग खाते: Silver ETF खरेदी करण्यासाठी डिमॅट आणि ट्रेडिंग खाते आवश्यक असते.
- फंडची निवड: उपलब्ध सिल्व्हर ETF पैकी निवड करताना त्याचा खर्च, ट्रॅकिंग एरर, व्यवहारांचे प्रमाण आणि फंडाची कामगिरी तपासा.
- युनिट्स खरेदी करा: ब्रोकरच्या अॅप किंवा प्लॅटफॉर्मवरून बाजाराच्या वेळेत युनिट्स खरेदी करता येतात.
- विक्रीचा पर्याय: गरज पडल्यास शेअर बाजारात युनिट्स विकता येतात. मात्र, त्यासाठी पुरेशी बाजारातील तरलता असणे महत्त्वाचे आहे.
Silver ETF चे फायदे काय?
प्रत्यक्ष चांदी खरेदी करताना साठवणूक, सुरक्षितता आणि शुद्धतेची काळजी घ्यावी लागते. ETF मध्ये हे प्रश्न तुलनेने कमी होतात. याशिवाय, गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष चांदी हाताळण्याऐवजी डिजिटल स्वरूपात युनिट्स ठेवता येतात. मात्र, ETF मधील परतावा चांदीच्या किमतीशी संबंधित असल्याने तो निश्चित नसतो.
गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?
चांदीच्या किमतीवर औद्योगिक मागणी, जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे मूल्य आणि आयातविषयक धोरणांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चांदीची किंमत वाढेलच, असे गृहीत धरून गुंतवणूक करू नये. ETF चा बाजारभाव त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यापेक्षा (NAV) जास्त किंवा कमी असू शकतो. तसेच खर्च आणि ट्रॅकिंग एररमुळे प्रत्यक्ष चांदीच्या परताव्यापेक्षा ETF चा परतावा वेगळा असू शकतो.
कर आकारणीही समजून घ्या
Silver ETF मधून युनिट्स विकून नफा झाल्यास भांडवली नफ्याचा कर लागू होऊ शकतो. कराचा दर आणि नफ्याचे वर्गीकरण हे लागू कायदे, खरेदी-विक्रीच्या तारखा आणि गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी अद्ययावत करनियम तपासणे आवश्यक आहे.
ADVERTISEMENT












