डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेकडील तेलकोसवाडी परिसरात जुन्या वादातून 26 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. साहिल राजू गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे. 19 ऑक्टोबरच्या रात्री एका शाळेबाहेरील रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तीन प्रौढ आरोपींना अटक केली असून दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
मावस भावाच्या जुन्या भांडणातून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल गायकवाड याचा मावस भाऊ गुड्डू ऊर्फ अथर्व हिवाळे आणि आरोपी दिशांत गणेश गायकवाड यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी कथितरीत्या एकत्र येत साहिल आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला. या वेळी साहिलला ठोशाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी हर्षद गिरी याने हातातील धारदार चाकूने साहिलच्या छातीत वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साहिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हे ही वाचा>> नवी मुंबई: प्रेयसीसाठी बदललं नाव, दुर्लक्ष केल्यानं प्रियकरानं चाकूने वार करत तरुणीला संपवलं
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध
घटनेनंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके तयार करण्यात आली. या पथकांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
हे ही वाचा>> बीड: वधूने लग्नासाठी उकळले अडीच लाख, 48 तासांतच फसवणुकीचे रॅकेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत आरोपींना शोधून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीभूषण कामत, अभिजीत मोरे, प्रशांत मोरे, शकील जमादार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
जुन्या वादातून झालेल्या या हत्येमुळे डोंबिवली पश्चिमेतील तेलकोसवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक केली आहे. हर्षद संभाजी गिरी (वय 19 ), दिशांत गणेश गायकवाड (वय 20 ), कमलेश सुरेश मोकल (वय 26 ) याशिवाय दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना भिवंडी येथील बाल न्याय मंडळासमोर हजर करून बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












