विवाहित उर्मिला सिकंदरच्या प्रेमात पडली, दारूत गुंगीचं औषध देऊन काढला पतीचा काटा

मुंबई तक

• 08:11 AM • 23 Oct 2026

Crime News : उत्तर प्रदेशातील बागपत येथे पत्नी उर्मिला आणि तिचा कथित प्रियकर सिकंदर यांच्यावर पती प्रमोदच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विवाहित उर्मिला सिकंदरच्या प्रेमात पडली

point

दारूत गुंगीचं औषध देऊन काढला पतीचा काटा

Crime News : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील कोताना गावात पतीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नी उर्मिला हिला अटक केली आहे. या हत्येत तिचा कथित प्रियकर सिकंदर उर्फ कालू याचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिकंदर याला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. या कारवाईदरम्यान त्याच्या पायाला गोळी लागली. पोलिसांच्या दाव्यानुसार, पती प्रमोद उर्फ मोगली याला संपवण्यासाठी उर्मिला आणि सिकंदर यांनी कट रचला होता. या कटानुसार प्रमोदला आधी दारूमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळून पाजण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर रिकाम्या दारूच्या बाटलीने आणि बाटली फुटल्यानंतर तिच्या काचेने वार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : महिलेचा आवाज.., 'जरांगेंना शिंदेंमार्फत 500 कोटी पोहोचले'; ऑडिओ क्लीपने राज्यात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर हा कोताना गावात प्रमोद उर्फ मोगली याचे दुकान भाड्याने घेऊन दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता. याच दरम्यान त्याची ओळख प्रमोदची पत्नी उर्मिला हिच्याशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये कथित प्रेमसंबंध निर्माण झाले. पोलिसांच्या दाव्यानुसार, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ते एकमेकांना गुपचूप भेटत होते. प्रमोदच्या मुलाला या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर सिकंदरने प्रमोदच्या घरी जाणे बंद केले. मात्र, दोघांमधील फोनवरून होणारे संभाषण सुरूच होते. उर्मिला आणि सिकंदर यांनी देहरादून येथे जाऊन एकत्र राहण्याची योजना आखली होती. त्यासाठी पतीला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. 18 ऑक्टोबर रोजी हा कट अमलात आणल्याचा पोलिसांचा दावा आहे.

हेही वाचा : 'तो मराठवाड्यात गिळून घेईल तुम्हाला...', जरांगेंनी ऐकवलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिपमधील प्रत्येक शब्द जसाच्या तसा...

पोलिसांच्या तपासानुसार, उर्मिलाने सिकंदरला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि त्या दारूमध्ये मिसळून प्रमोदला पाजण्यास सांगितले. त्यानंतर सिकंदर प्रमोदला दारूची बाटली घेऊन प्राथमिक शाळेजवळून त्याच्या शेतातील ट्यूबवेलवर घेऊन गेला. तेथे दारूमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळून प्रमोदला पाजण्यात आल्याचा आरोप आहे. प्रमोदने विरोध केल्यानंतर सिकंदरने रिकाम्या बाटलीने त्याच्या डोक्यावर तीन ते चार वार केले. बाटली फुटल्यानंतर तिच्या काचेनेही त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर जखमी प्रमोदला उसाच्या शेतात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या दाव्यानुसार, हत्येनंतर सिकंदर रामलीला पाहण्यासाठी गेला होता. याच काळात उर्मिलाने त्याला व्हॉट्सॲप संदेश पाठवून योजना पूर्ण झाल्याबाबत विचारणा केली. सिकंदरने संदेशाद्वारे हत्येची पुष्टी केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट त्याने आपल्या मोबाइलमध्ये जतन केले होते.

दरम्यान, मंगळवारी रात्री लुहारी गावातील जंगल परिसरात पोलिसांनी सिकंदरला पकडण्यासाठी घेराव घातला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यावेळी सिकंदरने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 315 बोअरचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि एक वापरलेले काडतूस जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात उर्मिला आणि सिकंदर या दोघांनाही अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.