Mumbai triple seat bike riders arrested traffic rules violation : मुंबईत एका दुचाकीवरून तिघांनी प्रवास करत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. हेल्मेट न घालता ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या या तरुणांनी वाहतूक सिग्नल तोडतानाच मुंबई पोलिसांनाही आव्हान दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘अख्खा मुंबई अपना है, सब सिग्नल तोडो’ अशा शब्दांत ते बोलताना ऐकू येत आहेत. या प्रकाराची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. दिलशाद रमजान अली खान आणि मोहम्मद शाकिर मणियार अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. तर व्हिडीओ तयार करणारा तिसरा तरुण अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर ट्रकमध्ये मागून कार घुसली, मृत दाम्पत्याच्या कुटुंबियांना 1.80 कोटींची भरपाई
तिघांपैकी एकानेही हेल्मेट घातले नव्हते, बेदरकारपणे दुचाकी चालवली
मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोरील डी. एन. रोडवर हे तिघे एका दुचाकीवरून प्रवास करत होते. दुचाकीवर तिघेही बसले होते. विशेष म्हणजे, या तिघांपैकी एकानेही हेल्मेट घातले नव्हते. दुचाकी वेगाने आणि निष्काळजीपणे चालवली जात होती. यावेळी दुचाकी दिलशाद खान चालवत होता. त्याच्या मधल्या जागेवर आमिर खान बसला होता, तर सर्वांत मागे मोहम्मद शाकिर मणियार बसला होता. आमिर खान याने मोबाईलवरून सेल्फी व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये तिघांचीही हुल्लडबाजी स्पष्टपणे दिसत आहे.
हेही वाचा : मुंबई: लग्नातील जेवणाने वऱ्हाड्यांना फुड पॉइजनिंग, नवरा बायकोसह 27 जण रुग्णालयात दाखल
मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
व्हिडीओ तयार करताना हे तरुण मोठमोठ्याने बोलताना दिसतात. आम्ही तिघे एका दुचाकीवर बसलो आहोत, आमच्यापैकी कोणीही हेल्मेट घातलेले नाही आणि आम्ही वाहतूक सिग्नलही तोडत आहोत, तरीही आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही, असे ते म्हणत होते. त्यासाठी त्यांनी ‘मुंबई आमची आहे’ असा उल्लेखही केला. वाहतुकीचे नियम मोडत असतानाच कोणतीही भीती नसल्याच्या आविर्भावात ते कॅमेऱ्यासमोर बोलत होते. या व्हिडीओमध्ये तिघेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या प्रकाराची चर्चा सुरू झाली. मुंबईच्या रस्त्यांवर अशा प्रकारे तिहेरी सीट प्रवास करणे, हेल्मेट न घालणे आणि वाहतूक सिग्नल तोडण्याची कबुली देत त्याचे चित्रीकरण करणे, असे प्रकार या व्हिडीओतून समोर आले.
या प्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी अभिमन्यू पाटील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली. व्हिडीओच्या आधारे तपास करत पोलिसांनी दिलशाद रमजान अली खान आणि मोहम्मद शाकिर मणियार या दोघांना अटक केली आहे. तर व्हिडीओ तयार करणारा आमिर खान याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात तिघेही दुचाकीवरून प्रवास करत असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे व्हिडीओतून समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून तिसऱ्या तरुणाचा शोध सुरू ठेवला आहे.
ADVERTISEMENT












