गर्भवती पत्नीला जबरदस्तीने युरिया पाजला, नंतर गळफास देऊन आत्महत्येचा बनाव

मुंबई तक

22 Oct 2026 (अपडेटेड: 22 Oct 2026, 03:59 PM)

Gujarat Crime News : गुजरातमधील खेडा जिल्ह्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी पती आणि दीराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नॅनो युरिया पाजून हत्या केल्यानंतर आत्महत्येचा बनाव केल्याचा संशय आहे.

Gujarat Crime News

Gujarat Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गर्भवती पत्नीला जबरदस्तीने नॅनो युरिया पाजला

point

नंतर गळफास देऊन आत्महत्येचा बनाव

Gujarat Crime News : गुजरातमधील खेडा जिल्ह्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी पती आणि दीराला ताब्यात घेण्यात आले आहे. शेतीसाठी वापरला जाणारा युरिया जबरदस्तीने पाजून तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महुधा येथे ही घटना घडली. अरुणाबेन असे मृत महिलेचे नाव आहे. सुरुवातीला तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात आणि शवविच्छेदन अहवालातून तिचा मृत्यू गळफासामुळे नव्हे, तर विषारी पदार्थाचे सेवन केल्यामुळे झाल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती मितुल सोढा आणि दीर विपुल सोढा यांना ताब्यात घेतले आहे. अरुणाबेनचा भाऊ विरेंद्रसिंह याने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पती, सासू कैलाशबेन, दीर विपुल आणि नणंद अल्पाबेन यांच्याकडून अरुणाबेनचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याने कुटुंबात वारंवार वाद होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : मनोज जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, श्रीकांत शिंदेंना 500 कोटी पोहोचल्याची क्लीप ऐकवली!

घटनेपूर्वी पतीने इंटरनेटवर माहिती शोधली

पोलिसांच्या तपासानुसार, घटनेच्या रात्री अरुणाबेन आणि तिचा पती मितुल यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादानंतर मितुलने पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणात पतीची काय जबाबदारी असते, याबाबत इंटरनेटवर माहिती शोधल्याचे तपासात आढळले. त्यानंतर त्याने अरुणाबेनला सोफ्यावर जबरदस्तीने धरून तिच्या तोंडात शेतीसाठी वापरला जाणारा द्रवरूप नॅनो युरिया ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत कुटुंबातील इतर सदस्यांचाही सहभाग होता का, याचा तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासानुसार, अरुणाबेनचे पाय अल्पाबेनने धरले होते, तर कैलाशबेनने तिचे हात पकडले होते, असे आरोप आहेत. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलीस संबंधित पुरावे आणि जबाबांची पडताळणी करत आहेत.

गळफास घेतल्याचा बनाव केल्याचा संशय

अरुणाबेनचा मृत्यू झाल्यानंतर तो आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. घराच्या मागील बाजूच्या खोलीत खिडकीजवळ नायलॉनच्या दोरीने तिचा मृतदेह लटकवण्यात आल्याचे तपासात समोर येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर परिस्थितीबाबत इतरांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेह खाली उतरवण्यात आल्याचाही पोलिसांना संशय आहे. घटनेनंतर नॅनो युरिया असलेली प्लास्टिकची पिशवी घरातील चुलीत जाळण्यात आल्याचे तपासात आढळल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण प्रकार लपवून ठेवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत याबाबत माहिती उघड होऊ दिली नाही, असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व घटनाक्रमाची पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

महत्त्वाचे पुरावे जप्त, इतर सदस्यांचीही चौकशी

पोलिसांनी घटनास्थळावरून नायलॉनची दोरी, मोबाइल फोन, ब्लेड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. या वस्तूंचा तपासासाठी उपयोग केला जात आहे. अरुणाबेनचा पती मितुल आणि दीर विपुल यांना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणात कुटुंबातील इतर सदस्यांची भूमिका काय होती, याचाही तपास सुरू आहे. अरुणाबेनचा मृत्यू आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी अन्य कोणाची मदत घेण्यात आली होती का, याचा शोध पोलीस घेत आहेत. मृत्यूपूर्वी तिचा छळ झाल्याच्या आरोपांचाही तपासाचा भाग म्हणून विचार केला जात आहे. जप्त केलेले पुरावे, तक्रारीतील आरोप आणि घटनाक्रम यांची पडताळणी करून प्रत्येक संशयिताची भूमिका निश्चित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या प्रकरणातील तपास अद्याप सुरू आहे.