Dharashiv Crime News, गणेश जाधव : प्रेमप्रकरणाच्या निव्वळ संशयावरून तुळजापूर शहरात दोन तरुणांना अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी आणि हिंसक घटनेत समीर जब्बार पटेल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अरबाज अफसर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्या अरबाजवर सध्या धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तुळजापूर शहर आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून कमालीची खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
सलग दोन तास मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज सय्यद हा तुळजापूर शहरात चहा पीत बसलेला असताना तिघांनी त्याला बळजबरीने एका वाहनात डांबले आणि शिंदे महाराज यांच्या शेतात नेले. तेथे नेऊन त्याच्या तोंडावर व पाठीवर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयितांनी जबरदस्तीने अरबाजच्या मोबाईलचा पासवर्ड घेऊन मोबाईलची तपासणी केली. मोबाईलमध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद आढळले नाही, तरीही त्याला पुन्हा अमानुष मारहाण करण्यात आली. 'तू आमच्याच भागात कमावतोस आणि आमच्या मुलींना त्रास देतोस' असा आरोप करत अरबाजच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेण्यात आले आणि सलग दोन तास त्याला मारहाण करण्यात आली.
हे ही वाचा : 'राज्यात 72 पेक्षा भयानक दुष्काळ...' राज ठाकरेंचा मोठा निर्णय, दिवाळी साजरी करण्याबाबत काय सांगितलं?
पार्किंग परिसरात टाकून पोबारा
यानंतर संशयितांनी समीर पटेल यालाही फोन करून त्याच घटनास्थळी बोलावून घेतले. समीर तेथे पोहोचताच आधीच उपस्थित असलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्याला बेदम मारहाण केली. टोळक्याने केलेल्या या मारहाणीत समीरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. समीरचा मृत्यू झाल्यानंतर आणि अरबाजही गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्यानंतर, त्यालाही मृत समजून टोळक्याने तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात आणून टाकले व तेथून पोबारा केला.
हे ही वाचा : काँग्रेसच्या बसमधील व्हिडिओ व्हायरल, महिला खासदारावर हात उचलल्याचा आरोप, शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
शहरात तणावाचे वातावरण
अरबाज गंभीर जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका तरुणाचा जीव गेल्याने आणि दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांची अधिकृत भूमिका आणि तपासाचे पूर्ण तपशील समोर आल्यानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












