Crime News : गुजरातमधील राजकोट येथे प्रेमविवाहाच्या सात वर्षांनंतर एका तरुणाची त्याच्या मेहुण्याने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विमल वानिया (वय 27) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर अवघ्या 23 सेकंदांत 13 वेळा चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी कमलेश धंडाल आणि त्याच्या कथित साथीदाराला अटक केली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाजवळ ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले आहे. विमल याने कमलेशची बहीण शीतल हिच्याशी सुमारे सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला शीतलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी शीतलशी संबंध तोडले होते. मात्र, जुन्या कौटुंबिक वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबईची खबर : BMC चे 'पादचारी प्रथम' अभियान किती यशस्वी? आयुक्तांनी थेट आकडेवारीच सांगितली
वाहनाच्या नोंदणीसाठी पत्नीच्या माहेरच्या पत्त्याचा वापर, अन् तिथेच गेम झाला
पोलिसांच्या माहितीनुसार, विमलने आपल्या पत्नीसाठी नवीन वाहन खरेदी केले होते. या वाहनाच्या नोंदणीसाठी त्याने पत्नीच्या माहेरच्या पत्त्याचा वापर केला होता. यामुळे शीतलच्या कुटुंबीयांमधील जुना राग पुन्हा उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. याच कारणावरून कमलेशने विमलची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी कमलेशने विमलला फोन करून शहरातील एका दुकानाजवळ बोलावले होते. त्याच्या घरी आलेली वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राची (आरसी बुक) प्रत देण्याच्या बहाण्याने त्याने विमलला तिथे बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. विमलला या ठिकाणी बोलावून त्याच्यावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
हेही वाचा : नागपूर: विद्यार्थिनीला पाठवले अश्लील मेसेज, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या प्रोफेसरचं लज्जास्पद कृत्य
गंभीर जखमा झाल्याने विमल जमिनीवर कोसळला
या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण समोर आले असून, त्यामध्ये कमलेश विमलला दुकानातून बाहेर ओढून आपल्या दुचाकीजवळ नेताना दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर तो विमलला मारहाण करतो आणि जवळील चाकूसारख्या शस्त्राने त्याच्यावर वार करतो. अवघ्या २३ सेकंदांत विमलवर 13 वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमा झाल्याने विमल जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर घटनास्थळी लोक जमा होऊ लागले. मात्र, त्याआधीच कमलेश दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून गेला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विमलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विमलच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, कमलेशने पतीला एका ठिकाणी बोलावून घेतले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. आपल्या भावानेच पतीचा जीव घेतल्याचा आरोप करत शीतलने कमलेशला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. प्रेमविवाहामुळे निर्माण झालेला कौटुंबिक वाद आणि वाहनाच्या नोंदणीसाठी वापरलेल्या पत्त्यावरून पुन्हा निर्माण झालेला राग, या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. विमलच्या पश्चात पत्नी आणि मुले आहेत. या प्रकरणात कमलेशसह त्याच्या कथित साथीदाराला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ADVERTISEMENT












