दोन बहि‍णींवर गोळीबार, नवी मुंबईत खळबळ; आरोपी मूळचा सोलापूरचा; काय घडलं?

सुमित भुजबळ

06 Nov 2026 (अपडेटेड: 06 Nov 2026, 05:31 PM)

Navi Mumbai Firing Case : प्रेमसंबंधातून गोळीबाराचा संशय; नवी मुंबईत दोन बहिणींवर गोळ्या झाडल्या, एकीच्या कानाला तर दुसरीच्या पाठीला दुखापत

Navi Mumbai Firing Case

Navi Mumbai Firing Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दोन बहि‍णींवर गोळीबार, नवी मुंबईत खळबळ

point

आरोपी मूळचा सोलापूरचा; काय घडलं?

Navi Mumbai Firing Case : नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 1 मध्ये दोन बहिणींवर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.5) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत 22 वर्षीय रितू धोबी आणि 20 वर्षीय तन्नू धोबी या दोघी जखमी झाल्या आहेत. रितूच्या कानाला, तर तन्नूच्या पाठीला गोळी लागली आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमी मुलींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Govt Jobs : दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी, महिन्याला दीड लाखांहून अधिक पगार

 घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

या गोळीबार प्रकरणात अर्जुन चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा साथीदार राकेश चव्हाण हा फरार असल्याची माहिती आहे. आरोपी आणि जखमी मुली एकाच परिसरात राहत असून त्यांची एकमेकांशी ओळख असल्याचंही समोर आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपीचा वाढदिवस असल्याने त्याने पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र, संबंधित मुलगी या पार्टीला आली नाही. याच रागातून आरोपीने गोळीबार केल्याची चर्चाही आहे. मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

हेही वाचा : TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप, इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आरोपी आणि जखमी मुलींची एकमेकांशी नेमकी काय ओळख होती?

नवी मुंबई पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गोळीबाराचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादीच्या घरी ही घटना घडली. गोळीबारात दोन मुली जखमी झाल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना सुरुवातीला नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर जेजे रुग्णालयात पाठवण्यात आलं. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीकडून वापरण्यात आलेलं शस्त्र कुठून आणलं? त्याने ते कशासाठी खरेदी केलं आणि ते कोणाचं आहे? याची माहिती पोलीस घेत आहेत.

या प्रकरणात आरोपी आणि जखमी मुलींची एकमेकांशी नेमकी काय ओळख होती? त्यांच्यात कोणत्या प्रकारचे संबंध होते आणि गोळीबारामागे नेमकं कारण काय होतं? याचा तपास सुरू असल्याचं विजय खरात यांनी सांगितलं. आरोपी हा फिर्यादीच्या घराच्या मागील बाजूस राहत असल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोपी मूळचा सोलापूरचा असल्याचंही तपासात समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेत आरोपीव्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग आहे का? गोळीबारासाठी शस्त्र कोणी उपलब्ध करून दिलं आणि त्याची खरेदी कुठून करण्यात आली? याचाही शोध घेतला जात आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर गोळीबारामागचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.