Beed Crime, योगेश काशीद : बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण याचा मृतदेह बीड जवळील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी धाराशिव पोलीस भरतीत खेळाडू कोट्यातून अर्ज केलेल्या वैभवच्या वाट्याला आलेली नोकरी एका बोगस प्रमाणपत्राच्या आधारे अन्य उमेदवाराने लाटली होती. या अन्यायाविरुद्ध लढत वैभवने एका मोठ्या बोगस खेळाडू प्रमाणपत्राच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये राज्यातील 14 पोलीस कर्मचाऱ्यांसह काही क्रीडा अधिकारीही निलंबित झाले होते.
ADVERTISEMENT
'त्या' संघटनेच्या धमक्या अन् मृत्यू
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळे वैभव चव्हाणला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. पुणे गुन्हे शाखेने याप्रकरणी सप्टेंबर 2026 मध्ये बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष व सचिवांना अटक केल्यानंतर या धमक्यांमध्ये वाढ झाली होती. स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगत वैभवने यापूर्वी काही ऑडिओ रेकॉर्डिंग करून आपल्या मित्राला पाठवल्या होत्या, ज्यामध्ये "माझा मृत्यू कशाही पद्धतीने झाला तरी त्याला कुराश संघटना जबाबदार असेल," असा स्पष्ट उल्लेख होता. गुरुवारी (5 नोव्हेंबर) इमामपूर शिवारात त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाल्यानंतर या प्रकरणाला नाट्यमय आणि गंभीर वळण लागले आहे.
हे ही वाचा : Weather Report: मुंबई, ठाणे, पुणेकरांनो लक्ष द्या! पाहा पावसाची किती शक्यता?
पोलीस भरतीवेळी काय घडलं?
वैभव चव्हाण उत्कृष्ट कराटेपटू होता. त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावचे प्रमाणपत्र होते. 2024-25 मध्ये त्याने धाराशिव पोलिस भरतीमध्ये खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. वेटिंग लिस्टमध्ये असताना नागनाथ साबळे नावाचा एक उमेदवार बोगस प्रमाणपत्र काढत नोकरीला लागला होता. या प्रकरणी वैभवने क्रीडा आयुक्तालय बालेवाडी, पुणे येथे तक्रार केली होती. या तक्रारीवरून बोगस खेळाडू प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेट बाहेर आले होते. कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिवांसह त्या-त्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून वैभवच्या आणि त्याच्या मित्राच्या जीवितास धोका असल्याचे तो सांगत होता. तशा रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: ना सोने खरेदी, ना जमीन... फक्त डेटा सेंटर क्षेत्रातून कमाईची मोठी संधी!
नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
मृत वैभवच्या अंगावर मारहाणीच्या स्पष्ट जखमा आढळून आल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी हा आत्महत्या नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून यामागे मोठ्या रॅकेटचा हात असल्याचा संशय व्यक्त करत नातेवाईक व ग्रामस्थांनी या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी बीड ग्रामीण पोलिसांकडे केली आहे. तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
हे ही वाचा : सतेज पाटील महायुतीला कसे पुरून उरले? बंटी पाटलांनी 'मुंबई Tak चावडी'वर सांगून टाकलं सीक्रेट!
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून कसली चौकशी सुरू केली आहे. वैभवने केलेल्या तक्रारी आणि त्याच्या मृत्यूपूर्वी व्हायरल झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या आधारे पोलीस आता धमकी देणाऱ्या आणि या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या इतर संशयितांचा शोध घेत आहेत. क्रीडा क्षेत्रातील बोगस प्रमाणपत्रांचे काळे जाळे उघडकीस आणणाऱ्या एका होतकरू तरुणाचा अशाप्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर बाहेर यावे, अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.
ADVERTISEMENT












