तुळजापूर : माजी नगराध्यक्षाने क्रूरतेचा कळस गाठला, एकाचा मर्डर अन् दुसऱ्याला काळंनिळं होईपर्यंत मारलं

मुंबई तक

06 Nov 2026 (अपडेटेड: 06 Nov 2026, 02:05 PM)

Tuljapur sameer patel murder case : तुळजापुरात 18 वर्षीय समीर पटेलची मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य चार आरोपींचा शोध सुरू आहे.

Tuljapur sameer patel murder case

Tuljapur sameer patel murder case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तुळजापूर : माजी नगराध्यक्षाने क्रूरतेचा कळस गाठला

point

एकाचा मर्डर अन् दुसऱ्याला काळंनिळं होईपर्यंत मारलं

Tuljapur sameer patel murder case, गणेश जाधव : तुळजापूर शहरात एका 18 वर्षीय तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समीर जब्बार पटेल असं मृत तरुणाचं नाव असून, या घटनेत त्याचा नातेवाईक अरबाज सय्यद हा देखील गंभीर जखमी झाला आहे. मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तुळजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष देविदास कदम ऊर्फ परमेश्वर आणि संजय विलास जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य चार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे तुळजापूर शहरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप, इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नेमकं प्रकरण आहे तरी काय? 

समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याच महाविद्यालयातील मुलीला समीर त्रास देत असल्याची आणि तिचा पाठलाग करीत असल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी केली होती. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांपूर्वी संतोष कदम यांनी समीर आणि त्याच्या आई-वडिलांना घरी बोलावून समज दिली होती. या घटनेनंतर समीरने महाविद्यालयात जाणे बंद केले होते. तो पावाच्या भट्टीत काम करू लागला होता. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी समीर परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेला होता. परीक्षा संपल्यानंतर तो घरी परतला. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून नातेवाईक सतार पटेल यांना आणण्यासाठी तो घटशील पार्किंग परिसरात गेला होता. मात्र, तेथून संतोष कदम यांनी त्याला आपल्या घरी नेल्याची माहिती सतार पटेल यांनी समीरच्या आईला फोन करून दिली.

हेही वाचा : ड्रायव्हरने सासरचं अख्खं कुटुंब एका वरवंट्यानं संपवलं, शहरभर मृतदेहांचा शोध सुरु; नेमकं काय घडलं?

जुन्या कारणावरून समीरला मारहाण केल्याचा आरोप

यानंतर समीरचे वडील जब्बार पटेल संतोष कदम यांच्या घरी गेले. काही वेळाने समीरची आई आणि काकू लैला पटेल यादेखील तेथे पोहोचल्या. त्यावेळी संतोष कदम आणि त्यांचे मेहुणे संजय जाधव यांनी जुन्या कारणावरून समीरला मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर संतोष कदम चार जणांना घेऊन पुन्हा आले आणि समीरला बाहेर घेऊन गेले. त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी समीरचा मोबाईलही काढून घेण्यात आला. समीरच्या आई-वडिलांना घरातच थांबवून ठेवण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. रात्री उशिरा समीरचा नातेवाईक अरबाज सय्यद घरी आला. त्याच्या पाठीवर, पोटावर, मांड्यांवर, पायांवर आणि गालावर काठी व पट्ट्याने मारहाण केल्याच्या जखमा होत्या. मस्के, प्रणव देवकते आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोघांनी मारहाण केल्याचे अरबाजने सांगितले. तसेच समीरला भारतीयबुवा मठाजवळील पार्किंगमध्ये टाकल्याची माहितीही त्याने दिली.

यानंतर समीरच्या कुटुंबीयांनी पार्किंग परिसरात शोध घेतला असता वॉचमनच्या लहान खोलीजवळ समीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तातडीने टेम्पोमधून तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अरबाजलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. समीरची आई अन्सर जब्बार पटेल यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कदम आणि संजय जाधव या दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य चार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. समीर आणि अरबाज यांना घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. या वाहनाच्या अनुषंगानेही तपास सुरू आहे.