Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यावसायिक वर्चस्वाच्या वादातून आणि जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मित्रानेच आपल्या मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची थरारक घटना गुरुवारी (22 ऑक्टोबर) सकाळी घडली. देवेश ऊर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (37) असे मृत तरुणाचे नाव असून, पवन दिलीप पाराशर असे संशयित आरोपीचे नाव आहे. दोघेही जुने मित्र होते आणि एकाच शाळेत शिकले होते. तसेच हॉटेल व बारला बाउंसर पुरवण्याचे काम करण्यासोबतच ते इतर व्यवसायातही सक्रिय होते. मृत बंटी हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता. फेसबुक किंग अशी त्याची ओळख होती. त्याचे फेसबुकवर 234 के फॉलोअर्स तर इंस्टाग्रामवर त्याचे 203 के फॉलोअर्स होते.
ADVERTISEMENT
आधी धडक, नंतर डोक्यावर वार
गुरुवारी सकाळी बंटी नेहमीप्रमाणे जिमला जाऊन मोपेडवरून घरी परतत असताना, आरोपी पवनने कारमधून त्याचा पाठलाग केला. बजरंग चौक ते बळीराम पाटील चौकादरम्यान मंगेश गॅस एजन्सीसमोर पवनने आपली कार बंटीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत बंटी रस्त्यावर कोसळला आणि गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपीने कारमधून लाकडी दांडा काढून रस्त्यावर निपचित पडलेल्या बंटीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून त्याचे डोके व चेहरा पूर्णपणे ठेचून काढला, ज्यामुळे बंटीचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : CJP चे आंदोलन आता थंडावणार? सौरव दास आणि आशुतोष रांकाने काय दिली हमी?
हत्या करुन आत्मसमर्पण
सिडको पोलिस ठाण्यापासून अवघ्या 650 मीटर अंतरावर आणि शेकडो नागरिकांसमोर भरदिवसा हा रक्तरंजित थरार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिक हादरून गेले. क्रूरपणे हत्या केल्यानंतर आरोपी पवन पाराशर स्वतः कार चालवत थेट सिडको पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली.
हे ही वाचा : Maharashtra El Nino : दुष्काळासह आणखी एक संकट, महाराष्ट्राची चिंता वाढली?
आरोपीचा दहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह
या हत्येमागे व्यावसायिक वर्चस्ववाद आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपमानाचा राग मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत बंटी दीक्षित सिडको भागात मेस चालवत होता आणि सामाजिक कार्यातही सक्रिय होता. दुसरीकडे, आरोपी पवनचा दहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, परंतु गेल्या महिनाभरापासून त्याची वागणूक बिघडल्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT












