600 किलो चांदी, किंमत 18 कोटी, अन् मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोघांचा मृत्यू

Mumbai Ahmedabad highway accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी ब्रिज येथे चांदी वाहून नेणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर 600 किलो चांदी सुरक्षित हस्तगत करण्यात आली आहे.

palghar News

palghar News

मुंबई तक

15 May 2026 (अपडेटेड: 15 May 2026, 06:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

600 किलो चांदी, किंमत 18 कोटी

point

अन् मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोघांचा मृत्यू

Mumbai Ahmedabad highway accident, मो.हुसेन खान :  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (दि. 15 मे) सकाळी एक भीषण अपघात झालाय. चारोटी येथे चांदीची वाहतूक करणाऱ्या एका व्हॅनला झालेल्या या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी सुमारे 6 : 20 वाजण्याच्या सुमारास चारोटी ब्रिज येथे घडला. 

हे वाचलं का?

हेही वाचा : बॉयफ्रेंडच्या नादात खाल्ल्या घरचे वासे मोजले, करोडपतीच्या लेकीनं काय केलं?

प्राथमिक माहितीनुसार, नाकोडा बुलियन, मुंबई या कंपनीकडून गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी येथील मोदीसन लिमिटेड (मोदीसेन लि.) कंपनीकडे 600 किलो ग्रॅम वजनाच्या चांदीच्या 20 प्लेट घेऊन एक व्हॅन जात होती. या वाहनाचा क्रमांक MH-48-BM-3001 असा होता. या वाहतूक केल्या जाणाऱ्या चांदीची अंदाजे किंमत सुमारे 18 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : पुण्यात बॉम्ब ठेवणारा आरोपी सापडला, महाराष्ट्र ATS ने कुठून उचललं?

सदर चांदी घेऊन जाणारे वाहन मुंबई बाजूकडून गुजरातच्या दिशेने जात असताना अचानक चारोटी ब्रिजजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे ही व्हॅन थेट गुजरात लेनवरील हायवे डिव्हायडरला अत्यंत जोरदार धडकली आणि तिथून उसळून थेट मुंबई लेनमध्ये आली. त्याच वेळी मुंबई बाजूकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या GJ-39-TA-9242 या क्रमांकाच्या मोठ्या ट्रेलरची आणि या व्हॅनची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, चांदी वाहून नेणाऱ्या व्हॅनचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती.

कासा पोलिसांची घटनास्थळी धाव, जखमींवर रुग्णालयात उपचार

या भीषण अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी कोणतीही वेळ न गमावता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमधील दोन इसमांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी इसमाला तातडीने उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून, सध्या त्याच्यावर तेथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मृत व्यक्तींचे शवविच्छेदन आणि पुढील सोपस्कार करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून केली जात आहे.

18 कोटींची 600 किलो चांदी सुरक्षित; पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू

या अपघाताच्या तीव्रतेमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने अपघातग्रस्त वाहनामधील सुमारे 18 कोटी रुपये किमतीच्या 600 किलो ग्रॅम वजनाच्या चांदीच्या 20 प्लेट्स सुरक्षित स्थितीत मिळून आल्या आहेत. कासा पोलिसांनी हा सर्व चांदीचा साठा सुरक्षितरीत्या आपल्या ताब्यात हस्तगत केला आहे. या अपघात प्रकरणी कासा पोलीस ठाण्यामार्फत गुन्हा नोंदवण्याची आणि पुढील आवश्यक ती सर्व कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे कामही पोलिसांकडून करण्यात आले.