Mumbai Crime News : मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागातील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्यांना काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक भीषण घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या एका पतीने अत्यंत थंड डोक्याने कट रचून ही हत्या घडवून आणली. आरोपी भीमराज ओमप्रकाश शर्मा (48) याला आपल्या पत्नीचे विकास अशोक भुसारे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा दीर्घकाळापासून संशय होता. यापूर्वी विकासने पत्नीची छेड काढल्याची तक्रारही भीमराजने केली होती, मात्र त्यानंतरही विकास सतत त्याच्या पत्नीच्या संपर्कात राहिल्याने भीमराजच्या मनात संतापाची लाट होती. याच रागातून भीमराजने विकासला आपल्या घरी बोलावले आणि पत्नीच्या समोरच रक्तरंजित खेळ खेळला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सूनेला तोकड्या कपड्यात रील बनवण्याचं वेड, सासू-सासऱ्यांचं भयंकर पाऊल
या घटनेतील आरोपीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विकासला आपल्या जाळ्यात ओढले. भीमराजने विकासला घरी बोलावून पत्नीसह मिळून मद्यपानाची पार्टी आयोजित केली होती. रात्री उशिरापर्यंत हे तिघेही सोबत बसून दारू पीत होते. जेव्हा सर्वजण नशेमध्ये धुंद झाले, तेव्हा भीमराजने विकासला समजावण्याच्या सुरात 'माझ्या घरी वारंवार का येतोस, आता पुन्हा येऊ नकोस' असे बजावले. मात्र, काही क्षणातच भीमराजचा संयम सुटला आणि त्याने घरात असलेला चाकू उचलून आपल्या पत्नीच्या डोळ्यादेखत विकासचा गळा चिरण्यास सुरुवात केली. विकासचा जागीच मृत्यू होईपर्यंत आरोपी त्याच्यावर वार करत राहिला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
हेही वाचा : पायाचा अंगठा निळा पडला, अखिलेश यादवांच्या भावाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे!
आरोपीला 3 तासांत फिल्मी स्टाईलने अटक
हत्येच्या या थरारानंतर आरोपी भीमराजने घटनास्थळावरून पळ काढून आरेच्या घनदाट जंगलात आश्रय घेतला. मात्र, घटनेची माहिती मिळताच आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित चक्रे फिरवली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तीन पथके तयार केली आणि आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की, आरोपी जंगलाच्या वाटेने मुंबई सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहे. पोलिसांनी जंगलात सापळा रचून पाठलाग करत आरोपीला फिल्मी स्टाईलने धावून पकडले आणि अवघ्या तीन तासांच्या आत या हत्याकांडाचा उलगडा केला.
आरोपीने गुन्ह्याची दिली कबुली आणि न्यायालयीन कोठडी
आरोपी भीमराज शर्मा याला अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. पत्नी आणि विकास यांच्यातील कथित संबंधांच्या संशयातून आणि वारंवार सांगूनही विकासने संपर्क न तोडल्यामुळे ही टोकाची पावले उचलल्याचे त्याने सांगितले. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस आता या प्रकरणातील अधिक पुराव्यांची जमाजमव करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सूनेला तोकड्या कपड्यात रील बनवण्याचं वेड, सासू-सासऱ्यांचं भयंकर पाऊल
ADVERTISEMENT











