Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 2018 मध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याच्या कुटुंबाला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) 1 कोटी 80 लाख 99 हजार 232 रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातात अंकित चुघ आणि त्यांची पत्नी संजना चुघ यांचा मृत्यू झाला होता. न्यायाधिकरणाच्या सदस्य गौरी कवडीकर यांनी 29 ऑक्टोबर रोजी हा आदेश दिला. या प्रकरणात कार चालक अंकित चुघ यांना अपघातासाठी 70 टक्के, तर ट्रक चालकाला 30 टक्के जबाबदार धरण्यात आले आहे. पुढे जाणाऱ्या वाहनांपासून सुरक्षित अंतर राखणे ही प्रत्येक चालकाची जबाबदारी असल्याचे न्यायाधिकरणाने आदेशात स्पष्ट केले. मात्र, ट्रक चालकाचे वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे हेदेखील अपघाताचे एक कारण असल्याचे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दिग्गज नेते शाहांच्या भेटीला, पण सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती कशामुळे? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
कार एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ट्रकसोबत फरफटत गेली
हा अपघात 23 डिसेंबर 2018 रोजी झाला होता. अंकित भूपिंदरसिंह चुघ हे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून आपल्या वॅगनआर कारने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत पत्नी संजना आणि दोन अल्पवयीन मुलेही कारमध्ये होती. यावेळी त्यांच्या कारची पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून धडक बसली. ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला होता. धडक बसल्यानंतर कार एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ट्रकसोबत फरफटत गेली. या अपघातात अंकित आणि संजना गंभीर जखमी झाले. त्यांना पनवेल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाईसाठी न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता.
हेही वाचा : पुणे, बारामती आणि कोल्हापुरात पावसाचा कहर, एका रात्रीत चित्र बदललं, कुठे विक्रमी नोंद?
अपघाताच्या जबाबदारीबाबत निर्णय देताना न्यायाधिकरणाने कार चालकाने योग्य अंतर राखले असते आणि वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवला असता, तर वेळीच ब्रेक लावून अपघात टाळता आला असता, असे म्हटले. पुढे जाणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्यास प्रत्येक वेळी मागून येणाऱ्या वाहनाच्या चालकाला दोषी धरता येणार नाही, असेही न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणात कार चालकाने पुरेसे अंतर राखले नसल्याचे निरीक्षण नोंदवत त्यांना 70 टक्के जबाबदार ठरवण्यात आले. दुसरीकडे, ट्रक चालकाचे वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे अपघातास कारणीभूत ठरल्याने त्याची 30 टक्के जबाबदारी निश्चित करण्यात आली. ट्रकचा परवाना केवळ राजस्थान आणि गुजरात या राज्यांसाठी वैध होता. महाराष्ट्रात वाहन चालवण्यासाठी परवान्याची मुदत किंवा कार्यक्षेत्र वाढवण्यात आले नव्हते, असा युक्तिवाद विमा कंपनीने केला होता.
ट्रक मालकाकडून ही रक्कम वसूल करण्याचा अधिकार विमा कंपनीला
विमा कंपनीच्या या युक्तिवादावर न्यायाधिकरणाने महत्त्वाचा आदेश दिला. विमा कंपनीने आधी मृत दाम्पत्याच्या कुटुंबीयांना भरपाईची संपूर्ण रक्कम द्यावी आणि त्यानंतर ट्रक मालकाकडून ही रक्कम वसूल करण्याचा अधिकार कंपनीला असेल, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. दाम्पत्याचे उत्पन्न आणि इतर बाबींचा विचार करून एकूण 1 कोटी 80 लाख 99 हजार 232 रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आली. यामध्ये संजना चुघ यांच्या मृत्यूसाठी 92 लाख 53 हजार 500 रुपये, तर अंकित चुघ यांच्या मृत्यूसाठी 88 लाख 45 हजार 732 रुपये देण्याचे आदेश आहेत. संजना या सॅमसिध माउंट लिट्रा झी स्कूलमध्ये कार्यरत होत्या, तर अंकित चुघ हे डेल इंटरनॅशनल सर्व्हिसेसमध्ये वरिष्ठ डिलिव्हरी स्पेशालिस्ट म्हणून काम करत होते. दोघांच्या उत्पन्नाच्या आधारे न्यायाधिकरणाने भरपाईची रक्कम निश्चित केली आहे.
ADVERTISEMENT












