Mumbai News: आजारी असताना औषधांच्या बाबतीत झालेली चूक जीवावर बेतल्याच्या घटना पाहायला मिळतात. लहान मुलाने औषधाऐवजी चुकून वेगळंच द्रव्य प्यायल्याने त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचं बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल. मात्र मुंबईतील एका 59 वर्षीय व्यक्तीसोबत अशीच काहीशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. औषध घेताना केलेल्या छोट्याशा चुकीमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
लोअर परळचा रहिवासी असलेल्या एका 59 वर्षीय लॉंड्रीचालकाने खोकल्याचे औषध समजून कपड्यांवरील डाग घालवण्यासाठीचं लिक्विड प्यायल्याने त्याला मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी घडली. या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव सबाजित धोबी असल्याची माहिती मिळाली आहे. एन. एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
खोकल्याच्या औषधाऐवजी कपडे धुण्याचं लिक्विड...
मिळालेल्या माहितीनुसार, सबाजित धोबी हे लोअर परळ येथील दीपक सिनेमासमोरील चाळीत एकटेच राहत होते. त्याच ठिकाणी सबाजित लॉंड्रीचा व्यवसाय करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना खोकला झाला होता आणि त्यामुळे त्यांनी पालिकेच्या हॉस्पिटलमधून खोकल्याचे औषध आणले.
औषधासारख्या दिसणाऱ्या बाटलीतून त्यांनी कपड्यांवरील डाग घालवण्याचे लिक्विड ठेवले होते. या दोन्ही बाटल्या त्यांनी बाजूबाजूला ठेवल्या होत्या.
हे ही वाचा: 'कांटा लगा' गाण्यावर अवघ्यांना थिरकवणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन, नेमका कसा झाला मृत्यू?
त्रास न झाल्यामुळे दुर्लक्ष
बुधवारी ते रात्री नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना त्यांना खोकल्याचा त्रास होऊ लागला. कामाच्या गडबडीत असल्यामुळे आणि औषधाची बाटली तसेच कपडे धुण्याच्या लिक्विडची बाटली बाजूबाजूलाच ठेवल्यामुळे ते खोकल्याचे औषध समजून त्यांनी कपडे स्वच्छ करण्याचे लिक्विड प्यायले. काही वेळानंतर त्यांना चुकून लिक्विड प्यायल्याची जाणीव झाली आणि त्याच वेळी त्यांनी ती बॉटल फेकून दिली. मात्र, त्याचवेळी आरोग्यासंबंधी काहीच त्रास न जाणवल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि ते झोपी देले.
नाश्ता करताना रक्ताची उल्टी
गुरुवारी सकाळी 7:30 च्या दरम्यान नाश्ता करताना सबाजित यांना अचानक रक्ताची उल्टी झाली. शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयाच्या नेलं. रुग्णालयाकडे घेऊन जात असताना प्रवासात सबाजित यांनी कबुली देताना चुकून आपण काल कपडे स्वच्छ करण्याचं लिक्विड प्यायल्याचे सांगितले. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान संध्याकाळी सबाजित यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एन. एम. जोशी मार्ग पोलीस तातडीने रुग्णालयात पोहचले.
हे ही वाचा: युनियनच्या कामासाठी थांबवलं अन् खोलीत नेऊन... लॉ कॉलेजच्या विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार
सबाजित यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तसेच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी काही नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिसांना ज्या कपडे धुण्याच्या लिक्विडमुळे सबाजित यांचा मृत्यू झाला ते लिक्वीड असलेली बाटलीदेखील अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणामध्ये सबाजित यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांबरोबरच शेजारच्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे.
ADVERTISEMENT
