उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील धोरिया गावात तीन सख्ख्या बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकरी रमेश यांच्या सरोज, सावित्री आणि संतोष या तीन मुलींनी चामुंडा मंदिरातील हवनवेदीसमोर अग्नीला साक्षी मानून फेरे घेतल्याचे, तरुणाने तिघींच्या मंगळसूत्र व सिंदूर विधी केल्याचे आणि त्यानंतर आशीर्वाद घेतल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गेल्या बुधवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. त्यानंतर या चौघांनी आणखी एक रील शेअर करत हा विवाह खरा असल्याचा दावा केला, त्यामुळे या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पार्थ पवारांचं लग्न होणार 'या' दिवशी, तारीख जाहीर होताच पार्थ-कायनातचे Exclusive फोटोही आले समोर
असा विवाह झालाच नाही, पुजाऱ्यांचा दावा; हिंदू संघटनांचीही नाराजी
या व्हिडिओमधील आणखी एक बाब चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडिओमध्ये हसनपूर नगरपालिकेचे भाजपचे अध्यक्षही तीनही बहिणींसोबत दिसत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही महिलाही या रीलमध्ये दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे चामुंडा मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात असा कोणताही विवाह झाल्याचा स्पष्ट इन्कार केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेनंतर काही हिंदू संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : मोठी बातमीः PM मोदींच्या मध्यरात्रीच्या VIDEO नंतर काही मिनिटांतच सोनम वांगचूक यांनी सोडलं आमरण उपोषण
नगरपालिकेच्या अध्यक्षांची उपस्थिती
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी या विवाहाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या, तर मोठ्या संख्येने सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले. विशेषतः या व्हिडिओमध्ये नगरपालिकेच्या अध्यक्षांची उपस्थिती दिसत असल्याने त्यांच्यावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विवाह केल्याचा दावा करणाऱ्या तीनही बहिणींनी व्हिडिओमध्ये आनंद व्यक्त केला असला, तरी वाद वाढल्यानंतर त्या तिघी आणि संबंधित तरुण सध्या माध्यमांसमोर येण्याचे टाळत असल्याचे समोर आले आहे.
या तीनही बहिणींनी काही काळापूर्वीच इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आपली खाती सुरू केली होती. अवघे 27 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांच्या खात्यांवर लाखो फॉलोअर्स झाल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून त्यांना मोठी ओळख मिळाली असली, तरी या विवाहाबाबत किंवा व्हायरल व्हिडिओबाबत दोन्ही कुटुंबांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणावरील चर्चा आणि वाद कायम असून, व्हायरल व्हिडिओतील दाव्यांबाबत अधिकृत स्पष्टतेची प्रतीक्षा आहे.
ADVERTISEMENT












