Navi Mumbai Crime: मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून महिलांशी ओळख करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नवी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने दोन आरोपींना अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी आपली खोटी ओळख सांगून महिलांशी ओळख करायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
लग्नाचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पीडित महिलांना लग्नाचं आमिष दाखवून महिलांशी संपर्क साधायचे आणि त्यांचा विश्वास संपादन करायचे. त्यानंतर, एकत्र भविष्य घडवण्याचे आणि घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचं स्वप्न दाखवून, महिलांना त्यांच्या नावावर 'Pre Approved Personal Loan' कर्ज घेण्यास प्रवृत्त केलं गेलं. त्यानंतर कर्जाची रक्कम आरोपी आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घ्यायचे. काही प्रकरणांमध्ये, लैंगिक शोषणाचे आरोप समोर आले आहेत.
हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न! आता, रेल्वे स्थानकांवर नवीन सुविधा...
आरोपींकडून 89 लाख 40 हजार रुपये जप्त
या धक्कादायक प्रकरणात नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबई आणि पुणे येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासातून तक्रारदार आणि इतर चार महिला साक्षीदारांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यंत 89 लाख 40 हजार रुपये जप्त केले आहेत. तसेच, आरोपीने गोव्यातील एका कॅसिनोमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्याचंही सांगितलं जात आहे.
आदर्श प्रशांत म्हात्रे (34 वर्षे) आणि प्रेम किरण म्हात्रे (29) अशी आरोपींची ओळख समोर आली असून आरोपींकडून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तसेच, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. आता, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, मॅट्रिमोनियल साईटवर दिसणाऱ्या ओळखीच्या प्रोफाइलवर लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा
ADVERTISEMENT











