Thane Crime: ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने पैशांसाठी आपल्या दहा वर्षांच्या मुलीला एका वृद्ध एनआरआय (अनिवासी भारतीय) कडे देऊन टाकलं. नवी मुंबई पोलीसच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) ला या प्रकरणाबाबत कळताच त्यांनी तातडीने आरोपींविरुद्ध कारवाई केली. या पथकाने 10 वर्षांच्या पीडित मुलीला सेक्स रॅकेटच्या कचाट्यातून सोडवलं. पोलिसांनी आता पुढील कारवाई करत पीडितेची 30 वर्षीय आई आणि 70 वर्षीय वृद्ध एनआरआय यांना आरोपी म्हणून अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
एजन्सीच्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी AHTU चे वरिष्ठ अधिकारी पृथ्वीराज घोरपडे यांना संबंधित घटनेबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकरणातील आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खारघरच्या कोपरगाव परिसरातील रहिवासी असलेली एक महिला आपल्या 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तळोजा फेज-2 येथे एका व्यक्तीकडे पाठवत असल्याची माहिती मिळाली होती.
लैंगिक शोषण अन् बळजबरीने दारू पाजली...
या माहितीच्या आधारे आरोपींविरुद्ध कारवाई करत अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग यूनिटने संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि त्यानंतर, त्या अल्पवयीन पीडितेची सुरक्षितरित्या सुटका करण्यात आली. दरम्यान, त्या ठिकाणचा रहिवासी असलेल्या 70 वर्षीय आरोपी फारूक अल्लाउद्दीन शेख याला अटक करण्यात आली. आरोपी वृद्ध हा मूळ लंडन येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. पीडिता अल्पवयीन असल्याचं माहित असून सुद्धा आरोपीने मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि इतकेच नव्हे तर तिला बळजबरीने दारू देखील पाजल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: हडपसरमध्ये शाळकरी मुलीवर 23 वर्षीय तरुणाकडून अत्याचार, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
मुलीच्या बदल्यात दरमहा अडीच लाख रुपये...
अल्पवयीन पीडितेची आई सुद्धा या गुन्ह्यात सहभागी असल्याचं तपासात समोर आलं. ती आपल्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी आरोपी शेखकडे पाठवण्यास तयार झाली आणि आरोपी महिलेला या बदल्यात दरमहा अडीच लाख रुपये मिळणार असल्याचं निश्चित करण्यात आलं. या घृणास्पद कृत्याबद्दल पोलिसांनी मुलीच्या आईला देखील ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा: नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांसाठी काळजी करणारी पोस्ट, 6 शब्दात काय म्हणाले?
आरोपींविरुद्ध कारवाई
या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की दोन्ही आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आता या घटनेचा सखोल तपास करत असून रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा देखील शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT











