Ajit Pawar Death: अगदी बाजूलाच Runway, तरी शेवटच्या क्षणी काय चुकलं?, एका मिनिटात सगळंच संपलं!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. याच अपघाताचे काही फोटो हे नुकतेच समोर आले आहेत. जाणून घ्या याविषयी सविस्तर.

ajit pawar death runway was right nearby yet what went wrong at last moment everything ended in a one minute

Ajit Pawar Death

मुंबई तक

• 09:28 PM • 28 Jan 2026

follow google news

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा आज (28 जानेवारी) सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे येत असलेले खासगी लियरजेट 45 हे विमान धावपट्टीच्या अगदी बाजूला असलेल्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, यात दोन क्रू मेंबर्स (पायलट आणि को-पायलट), एक पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) आणि एक अटेंडंट यांचा समावेश आहे. अपघाताची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून, हजारो लोक घटनास्थळी जमा झाले. पण हा नेमका कुठे आणि कसा झाला याचे फोटो समोर आले आहेत.

हे वाचलं का?

विमान रनवेवर पोहोचायला काही सेकंदाचच अंतर. विमान पूर्णपणे रनवेवर उतरण्याच्या तयारीत. मात्र विमान लॅंडिंग होत असतानाचा काही कळायच्या आत क्षणात सगळ उध्वस्त झालं. तुम्ही फोटोंमध्ये पाहू शकतात की विमान रनवेच्या अगदी जवळ पोहोचलं होतं. धावपट्टीवर उतरायला फक्त 100 मीटर अंतर राहिलं होतं. मात्र रनवेवर पोहोचण्याच्या काहीच सेंकदांपूर्वी विमान दुसरीकडे कोसळलं आणि विमानाला आग लागली. क्षणात विमानाचे तुकडे तुकडे झाले.

या अपघाताचा तपास AAIB कडून केला जातोय. अजित पवारांच्या विमानाने सकाळी ८.१८ वाजता पहिल्यांदा बारामती एटीसीला संपर्क साधला होता. विमानाने बारामतीपासून ३० नॉटिकल मैलावरून पुढचा कॉल केला होता. अपघातग्रस्त विमानाच्या क्रूने हवामान आणि दृश्यमानबद्दल विचारलं तेव्हा एटीसीने त्यांना माहिती दिली. हवा शांत होती आणि दृश्यता जवळपास ३००० मीटर होती. त्यानंतर विमानाला रनवेवर उतरण्याची सूचना दिली गेली.

परंतु रनवे दिसत नव्हता. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात विमान गो अराऊंड करण्यात आलं. गो अराऊंडनंतर विमानातील पायलटने एटीसीला रनवे अजूनही दिसत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर काही सेकंदात रनवे दिसलं असं पायलटने सांगितलं. सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी रनवे ११ वर उतरण्याची परवानगी दिली. परंतु क्रू ने या लँडिंग क्लीयरेंसचा रिडबँक दिला नाही. एटीसीने रनवे ११ च्या थ्रेश होल्डजवळ आग पाहिली. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहचल्या. सुरुवातीच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावर दाट धुकं होतं आणि दृश्यमानता देखील खूप कमी होती.  

अपघाताची पार्श्वभूमी

अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमान बारामतीमधील धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असताना अचानक नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीच्या शेजारील शेतात कोसळलं. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळताना आणि त्यातून आगीचे लोळ उठतानाचे दृश्य कैद झाले आहे. हे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अपघाताची भीषणता त्यातून दिसून येते.

बारामती हे अजित पवार यांचे कौटुंबिक गाव असून, ते येथे राजकीय कार्यक्रमासाठी येत होते. अपघाताची वेळ सकाळी अंदाजे 8.50 वाजता असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान कोसळल्यानंतर लगेचच स्थानिक लोक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीमुळे बचावकार्याला अडथळा आला.

प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी आणि फोटो

अपघातानंतर घटनास्थळाचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यात विमानाचे अवशेष शेतात विखुरलेले दिसत आहेत. धावपट्टीच्या बाजूला असलेल्या शेतात विमान कोसळल्याने परिसरातील शेतजमीन आणि छोट्या नाल्यात विमानाचे तुकडे पसरले आहेत. फोटोंमध्ये हजारो लोक जमा झालेले, अग्निशमन वाहने, अँब्युलन्स आणि पोलिस दिसत आहेत. काही फोटोंमध्ये विमानाचे जळलेले भाग आणि धूर दिसत असून, बचावकार्यात सहभागी असलेले लोक दिसत आहेत.

एक प्रत्यक्षदर्शी शेतकरी म्हणाले, "विमान उतरत असताना अचानक ते बाजूला वळले आणि शेतात पडले. मोठा स्फोट झाला आणि आग लागली. आम्ही धावत गेलो, पण काहीच करता आले नाही." दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अपघातानंतर लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण आगीमुळे जवळ जाणे शक्य नव्हते.

अपघाताचे कारण आणि तपास

विमानात तांत्रिक बिघाड झालेला होता का? याची तपास केला जात आहे. बॉम्बार्डियर लियरजेट ४५ हे विमान खासगी चार्टर्ड असून, त्याची मालकी एका खासगी कंपनीकडे आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने (DGCA) अपघाताची चौकशी सुरू केली असून, ब्लॅक बॉक्स शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवामान स्वच्छ नसल्याने हा अपघात झाला आहे का? किंवा इंजिन फेल्युअर किंवा पायलट एररची शक्यता तपासली जात आहे.

महाराष्ट्र सरकारने या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे, "अजितदादांचा मृत्यू हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. त्यांचे योगदान विसरता येणार नाही."

अजित पवार यांचे राजकीय जीवन

अजित पवार (वय 66) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते होते. शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर स्वतंत्र गटाचे नेते झाले होते. ते सध्या उपमुख्यमंत्री आणि अर्थ खात्याचे मंत्री होते. बारामती हा त्यांचा मतदारसंघ असून, ते येथील विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अंत्यसंस्कार आणि शोक

अजित पवार यांचा मृतदेह बारामती रुग्णालयात आणण्यात आला असून, उद्या (29 जानेवारी) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात आज आणि उद्या शोक दिवस घोषित करण्यात आला आहे. या अपघाताने विमान सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

    follow whatsapp