भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंगाचा आरोप, चहाच्या टपरीवर नेमकं काय घडलं होतं?

मुंबई तक

25 Jun 2025 (अपडेटेड: 25 Jun 2025, 04:12 PM)

महिला पोलीस निरीक्षकाने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

point

महिला पोलीस अधिकाऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार

point

भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पुणे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी कोंढरे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुण्यात पोस्टरबाजी

चहाच्या टपरीवर काय घडलं होतं? 

सोमवारी शनिवार वाडा परिसरात एका कार्यक्रमानिमित्त भाजपचे नेते आणि कार्यकर्ते जमले होते. या कार्यक्रमानंतर कसबा पेठचे भाजप आमदार हेमंत रासने यांनी कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना जवळच्या एका चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी नेलं. यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन संबंधित महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार महिला निरीक्षकाने तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवली.

सीसीटीव्ही फुटेज तपासले, गुन्हा दाखल

महिला पोलीस निरीक्षकाने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासानंतर प्रमोद कोंढरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढरे यांचा खुलासा; आरोप फेटाळले

प्रमोद कोंढरे यांनी या प्रकरणी एक पत्रक जारी करत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी हा प्रकार गैरसमजातून घडल्याचा दावा केला आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे कोंढरे यांच्यावर यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, पुणे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.