मुंबई : तरुण-तरुणीला शिवीगाळ, मारहाण; अल्पवयीन मुलांची क्रूरता, व्हिडीओ व्हायरल

पृथ्वीराज पाटील

• 12:41 PM • 21 Nov 2026

मुंबईतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये आठ अल्पवयीन मुले एका जोडप्याला मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Kurla Couple Assault

Kurla Couple Assault

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलांची क्रूरता

point

तरुण-तरुणीला मारहाण

point

व्हिडीओ व्हायरल

Kurla Couple Assault : मुंबईतील कुर्ला परिसरात एका तरुण-तरुणीला अश्लील टिप्पणी करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फिनिक्स मॉलजवळील महानगरपालिकेच्या उद्यानात हे जोडपे फोटो काढत असताना 8 ते 10 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. या मुलांनी दोघांवर अश्लील शेरेबाजी केली. सुरुवातीला जोडप्याने या प्रकाराला विरोध केला; मात्र याचा राग आल्याने टोळक्याने दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

अल्पवयीनांची क्रूरता

व्हायरल व्हिडिओमध्ये उद्यानात फोटो काढणाऱ्या जोडप्याभोवती काही मुलांचा घोळका दिसत आहे. यावेळी ही मुले दोघांवर अश्लील टिप्पणी करत असल्याचे दिसते. जोडप्याने विरोध केल्यानंतर मुलांनी त्यांच्याशी हुज्जत घालत मारहाण सुरू केली. यातील एका अल्पवयीन मुलाने चप्पलसदृश वस्तूने तरुणाला मारहाण केली, तर दुसऱ्या मुलाने तरुणीवर काठीने वार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेदरम्यान उपस्थित काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हे ही वाचा : सोलापूर : नातवांच्या वेगळ्या वाटा! गणपतराव देशमुखांच्या नातवांमध्ये राजकीय संघर्ष?

आठ अल्पवयीन ताब्यात

या प्रकरणी पीडितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणात आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) हजर करण्यात येणार असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात पाच मुलांच्या पालकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

हे ही वाचा : बीड : भररस्त्यात 'रेस'चा जीवघेणा थरार; शेतकरी दाम्पत्याचा अंत, नगरसेवक पुत्र कार चालवत असल्याची चर्चा

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

दरम्यान, या घटनेचा भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निषेध करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर शिवसेना (UBT) नेते इंतखाब फारुकी यांनीही अशा प्रकारच्या घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा आणि तरुणींशी होणाऱ्या गैरवर्तनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.