सोलापूर : नातवांच्या वेगळ्या वाटा! गणपतराव देशमुखांच्या नातवांमध्ये राजकीय संघर्ष?

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी तब्बल एकाच पक्षाकडून 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला. मात्र त्यांचे दोन नातू आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

ADVERTISEMENT

Solapur Bank Election
Solapur Bank Election
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गणपतराव देशमुखांचे दोन नातू एकमेकांच्या विरोधात

point

सांगोल्यातील राजकारणात काय घडतंय?

Solapur Bank Election : सांगोल्याच्या राजकारणात सध्या देशमुख कुटुंबातील दोन नातवांच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकांची चर्चा रंगली आहे. सलग 60 वर्षे राजकारणात सक्रिय राहून तब्बल 11 वेळा एकाच पक्षाकडून आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसा त्यांचे नातू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख पुढे नेत आहेत. मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही बंधू वेगवेगळ्या पॅनलमधून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

सोलापूर बँक निवडणूकीत समोरासमोर

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनलमधून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख निवडणूक लढवत आहेत. ते सांगोला सोसायटी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलमधून डॉ. अनिकेत देशमुख निवडणूक लढवत आहेत. त्यांना भटक्या-विमुक्त जाती या आरक्षित मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजप प्रणीत पॅनलचे 11 पैकी 10 संचालक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित जागांसाठी चुरस कायम आहे.

हे ही वाचा : महायुतीत भाजपकडून ‘केसाने गळा कापण्याचा’ प्रयत्न! राजेंद्र गावितांचा गंभीर आरोप

यापूर्वीदेखील वेगवेगळ्या भूमिका

विशेष म्हणजे, दोन्ही नातवांच्या राजकीय भूमिका यापूर्वीही वेगवेगळ्या राहिल्या आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. तर डॉ. अनिकेत देशमुख यांनी भाजपविरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवला.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात येतंय संकट, 'या' जिल्ह्यांत संमिश्र हवामान

नव्या चर्चांना सुरुवात

एकेकाळी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गणपतराव देशमुख यांचे वर्चस्व होते. त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांनीही बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले होते. मात्र, आता त्यांच्याच दोन्ही नातवांनी वेगवेगळ्या राजकीय गटांची साथ घेतल्याने सांगोल्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आजोबांच्या विचारधारेचा वारसा सांगणारे दोन्ही नातू सहकार क्षेत्रातील निवडणुकीत आमनेसामने आल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा सांगोल्याच्या आगामी राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.