बीड : भररस्त्यात 'रेस'चा जीवघेणा थरार; शेतकरी दाम्पत्याचा अंत, नगरसेवक पुत्र कार चालवत असल्याची चर्चा

बीडमध्ये भररस्त्यात कारची रेस लावण्याचा जीवघेणा प्रकार एका शेतकरी दाम्पत्याच्या जीवावर बेतला आहे. अपघातग्रस्त क्रेटा कार एका नगरसेवकाचा मुलगा चालवत होता अशी चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

Beed Accident
Beed Accident
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये भयंकर अपघात

point

शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

point

नेमकं काय घडलं?

Beed Accident : बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळ भररस्त्यात वाहनांची रेस लावण्याचा जीवघेणा प्रकार एका शेतकरी दाम्पत्याच्या जीवावर बेतला आहे. शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास डक पेट्रोल पंपासमोर भरधाव क्रेटा कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रल्हाद गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी सुनिता गायकवाड यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे माजलगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

भररस्त्यातील रेसनं घेतला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून दोन चारचाकी वाहनांमध्ये भररस्त्यात रेस सुरू होती. दोन्ही वाहने अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे धावत होती. याचदरम्यान मंगरूळ क्रमांक 3 येथील प्रल्हाद श्रीमंत गायकवाड (वय 50) आणि त्यांची पत्नी सुनिता प्रल्हाद गायकवाड (वय 45) हे दुचाकीवरून माजलगाव शहराकडे येत होते. शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरी वसाहतीजवळील डक पेट्रोल पंपासमोर समोरून आलेल्या भरधाव क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारने प्रल्हाद गायकवाड यांना तब्बल 400 मीटरपर्यंत फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : सोलापूर : नातवांच्या वेगळ्या वाटा! गणपतराव देशमुखांच्या नातवांमध्ये राजकीय संघर्ष?

कारच्या एअरबॅग उघडल्या अन्...

अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिता गायकवाड यांना तातडीने माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. अवघ्या काही क्षणांत शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघातानंतर क्रेटा कारचालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, धडकेमुळे कारच्या एअरबॅग उघडल्याने वाहन जागेवरच थांबले.

हे ही वाचा : सोलापूर : प्रसाद म्हणून दिलेली चिक्की खाणं पडलं महागात, रेल्वेत महिलेने दांपत्याचा गेम कसा केला?

नगरसेवक पुत्र चालवत होता कार

दरम्यान, अपघातग्रस्त क्रेटा कार एका नगरसेवकाचा मुलगा चालवत होता, तर त्याच्या शेजारी रेणापूर येथील त्याचा मित्र बसला होता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली होती. भररस्त्यात वाहनांची रेस लावून निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.