वेदर रिपोर्ट : अवकाळी पावसाने कुठल्या भागांना झोडपलं? अलर्ट कुठे?
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून त्याची तीव्रता कमी झाली आहे. मात्र किनारपट्टी भागात पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा कायम आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज काय?
कडाक्याची थंडी कधी?
Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अकवान’ चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. या चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमधील काही भागांना अधिक फटका बसत असून, या ठिकाणी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सुरुवातीला या चक्रीवादळाचा परिणाम तेलंगणा आणि महाराष्ट्रातील विदर्भातही होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार चक्रीवादळाची दिशा बदलली असून ते वायव्य दिशेला सरकले आहे. तसेच त्याची तीव्रताही कमी होऊन ते आता डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले आहे.
राज्यात अवकाळी पाऊस?
महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण दिसत नाही. उपग्रह छायाचित्रांनुसार मुंबईसह कोकण आणि राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगांची दाटी नाही. गडचिरोली आणि गोंदिया परिसरात काही प्रमाणात ढग दिसत असले तरी मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील कोणत्याही भागासाठी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही.
हे ही वाचा : सोलापूर : नातवांच्या वेगळ्या वाटा! गणपतराव देशमुखांच्या नातवांमध्ये राजकीय संघर्ष?
किमान तापमानात घट
दरम्यान, उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा जोर वाढत आहे. पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतात थंड वारे आणि काही भागांत बर्फवृष्टी होत आहे. दुसरीकडे, अकवान चक्रीवादळामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे आजूबाजूची थंड हवा खेचली जात आहे. याचा परिणाम मध्य भारतातील हवामानावर होत असून, जळगाव, नंदुरबार आणि महाबळेश्वरसह काही भागांमध्ये किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरही रात्रीच्या वेळी तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : महायुतीत भाजपकडून ‘केसाने गळा कापण्याचा’ प्रयत्न! राजेंद्र गावितांचा गंभीर आरोप
राज्यात कडाक्याची थंडी कधी?
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे आणि थंड हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा जाणवू शकतो. किमान तापमानात साधारण दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या राज्यात हुडहुडी भरवणारी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अकवान चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसून, अवकाळी पावसाऐवजी तापमानातील चढ-उतार आणि रात्रीच्या गारव्याचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे.
