Mumbai News : मुंबईकरांचा पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने भांडुप संकुलात दोन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये दररोज 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) पाणी शुद्ध करण्याची क्षमता असलेले नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच, या केंद्रातून शुद्ध झालेले पाणी महासंतुलक जलाशयापर्यंत पोहोचवण्यासाठी दररोज 2 हजार MLD क्षमतेचे नवीन जल उदंचन केंद्र म्हणजेच पंपिंग स्टेशन उभारले जात आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या दोन्ही प्रकल्पांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. तसेच, दोन्ही प्रकल्पांची कामे 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
ADVERTISEMENT
आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र
भांडुप संकुल हे आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र असून, येथून मुंबईतील अनेक प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या या केंद्राची एकूण पाणी शुद्ध करण्याची क्षमता दररोज 2 हजार 810 दशलक्ष लीटर इतकी आहे. येथे 1 हजार 910 MLD आणि 900 MLD क्षमतेची अशी दोन युनिट्स कार्यरत आहेत. मात्र, मुंबईची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, भविष्यातील गरज पूर्ण करण्यासाठी आता आणखी 2 हजार MLD क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.
हे ही वाचा : सेंटर पॉईंट : भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, वचपा काढला?
शुद्धीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या नवीन केंद्रात पाणी अधिक प्रभावीपणे शुद्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पाण्यातील गढूळपणा, सूक्ष्म घनकण आणि इतर अशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी प्रगत शुद्धीकरण प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये अॅक्टिफ्लो प्रक्रिया, क्लोरिनेशन कॉन्टॅक्ट टँक, फ्लो स्प्लिटर, ड्युअल मीडिया फिल्टर, बॅकवॉश यंत्रणा आणि अॅक्टिडायन प्रक्रियेचा समावेश आहे. तसेच, प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे सांडपाणी बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र उपसा यंत्रणाही उभारली जाणार आहे.
हे ही वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणूक : भाजपचा छोट्या भावांनी गेम केला, पडद्याआड काय घडलं?
पाणीपुरवठा व्यवस्थेची क्षमता वाढणार
मुंबईचा वाढता विस्तार, नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता हे दोन्ही प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. नवीन जलशुद्धीकरण केंद्रामुळे मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेची क्षमता वाढण्यास मदत होईल, तर नवीन पंपिंग स्टेशनमुळे शुद्ध पाणी महासंतुलक जलाशयापर्यंत पोहोचवणे अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासोबतच मुंबईकरांना दीर्घकालीन आणि अधिक सक्षम पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
ADVERTISEMENT












