सेंटर पॉईंट : भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, वचपा काढला?
जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय नाराजीचा हिशेब इथे चुकता झाला का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोपही धुडकावल्याची चर्चा नेमकी काय? साताऱ्यात महायुतीच्या अंतर्गत राजकारणात काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
साताऱ्यात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष
सांगलीत काय घडलं?
Satara Bank Election : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने केलेल्या खेळीचा बदला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल सहा महिन्यांनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 26 मार्च रोजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपला 27 जागा मिळाल्या होत्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 30 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मिळून बहुमत असतानाही भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले. निवडणुकीच्या दिवशी दोन सदस्यांना जुन्या गुन्ह्यांच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केल्याने जिल्हा परिषद परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या कारवाईला विरोध करत मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी हस्तक्षेप केला. यावेळी झालेल्या झटापटीत दोन्ही नेत्यांसह काही कार्यकर्ते जखमी झाले. या संपूर्ण प्रकारामागे भाजपचे नेते जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांची खेळी असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. इतकंच नाही, तर दुसऱ्या दिवशी विधानसभेत बोलताना शिंदे यांनी साताऱ्यात लोकशाहीचा खून झाल्याचा गंभीर आरोप केला होता.
शिंदेंचं भाजपला प्रत्युत्तर
या घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. भाजपसोबतची युती असूनही अनेक ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपविरोधात भूमिका घेतली. दरम्यान, सहा महिन्यांनंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. या निवडणुकीत भाजपचे नऊ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे चार असे एकूण 21 संचालक निवडून आले होते. भाजप आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युती असल्याने बँकेवर महायुतीची सत्ता येईल आणि सर्वाधिक संचालक असलेल्या भाजपचा अध्यक्ष होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदे यांच्या शिवसेनेने अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. आठ राष्ट्रवादीचे आणि चार शिवसेनेचे असे 12 संचालक एकत्र आल्याने उदयसिंह पाटील अध्यक्षपदी, तर शिंदे गटाचे दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपने केलेल्या राजकीय खेळीला जिल्हा बँकेत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल्याची चर्चा सुरू झाली.
हे ही वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणूक : भाजपचा छोट्या भावांनी गेम केला, पडद्याआड काय घडलं?
सांगलीत शिंदेंची काँग्रेससोबत हातमिळवणी
साताऱ्यातील या राजकीय घडामोडींपेक्षाही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तांतर अधिक लक्षवेधी ठरले. सांगलीत भाजपचे पाच, शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन असे महायुतीकडे दहा संचालक होते. दुसरीकडे काँग्रेसचे सहा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच असे महाविकास आघाडीकडे दहा संचालक होते. माजी खासदार संजयकाका पाटील यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र, एकीकडे शिंदे गटाच्या नेत्यांकडून काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सांगलीत त्याच काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यात आली. परिणामी, तब्बल 22 वर्षांनंतर काँग्रेसचे महेंद्र लाड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले, तर शिंदे गटाचे तानाजी पाटील उपाध्यक्ष झाले. त्यामुळे राजकारणात विचारधारेपेक्षा सत्तेची समीकरणे महत्त्वाची ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भाजपविरोधात काँग्रेसला सोबत घेण्याची शिंदे गटाची रणनीती केवळ सांगलीपुरती मर्यादित नसून, राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये अशाच प्रकारच्या राजकीय आघाड्या पाहायला मिळत आहेत.
हे ही वाचा : Weather Update: नोव्हेंबरमध्येही उन्हाचा चटका कायम! मुंबईसह राज्याचं तापमान जाणार तब्बल...
भाजपसमोरील अडचणी वाढणार?
एकनाथ शिंदे यांच्या या बदललेल्या राजकीय भूमिकेमागे भाजपसोबतच्या सत्तासंघर्षाची पार्श्वभूमी असल्याचे मानले जात आहे. भाजपसोबत कितीही निष्ठेने राहिले, तरी आपला पक्ष आणि राजकीय ताकद वाढू दिली जाणार नाही, अशी जाणीव शिंदे यांना झाल्याची चर्चा आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह विविध महापालिका क्षेत्रांमध्ये भाजपकडून शिंदे गटाची ताकद मर्यादित करण्याचे प्रयत्न झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपला शह देण्यासाठी शिंदे यांनी इतर पक्षांशी जुळवून घेण्याची रणनीती स्वीकारल्याचे दिसते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस आणि मनसे यांच्यातही भाजपबाबत एक समान अविश्वास निर्माण होत असल्याचे या घडामोडींमधून अधोरेखित होत आहे. भाजप मित्रपक्षांना सोबत घेण्याऐवजी त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना प्रादेशिक पक्षांमध्ये वाढत असल्यास भविष्यात भाजपसमोरील अडचणी आणखी वाढू शकतात. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या पराभवाचा बदला शिंदे यांनी जिल्हा बँकेत घेतला का, यापेक्षाही भाजपचा मित्रपक्षांवरील विश्वास कमी होत चालला आहे का, हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
