नगरपालिकेच्या नगररचना अधिकाऱ्याकडे 6.76 कोटींचं घबाड सापडलं
तेलंगणातील मोईनाबाद नगरपालिकेच्या नगररचना अधिकारी गुंडू वाणी यांच्या आठ ठिकाणांवर ACB चे छापे. या कारवाईत 6.76 कोटींची मालमत्ता, 1.30 कोटींचे शेअर्स आणि 50 लाखांची वाहने आढळली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नगरपालिकेच्या नगररचना अधिकाऱ्याकडे 6.76 कोटींचं घबाड सापडलं
या कारवाईत 6.76 कोटींची मालमत्ता, 1.30 कोटींचे शेअर्स आणि 50 लाखांची वाहने आढळली
Telangana ACB Raid : तेलंगणातील मोईनाबाद नगरपालिकेच्या नगररचना अधिकारी गुंडू वाणी यांच्या आठ ठिकाणांवर ACB ने छापे टाकले. या कारवाईत 6.76 कोटींची मालमत्ता, 1.30 कोटींचे शेअर्स आणि 50 लाखांची वाहने आढळली आहेत. यापूर्वी 75 हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. आता उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील मोईनाबाद नगरपालिकेच्या नगररचना अधिकारी गुंडू वाणी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्ट मार्गांचा वापर करून ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी 16 नोव्हेंबर रोजी ACB ने एकाच वेळी आठ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये गुंडू वाणी यांचे निवासस्थान, कार्यालय तसेच त्यांचे नातेवाईक, सहकारी आणि कथित बेनामीदारांशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. या तपासादरम्यान अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा : रोहित पवारांनी फडणवीसांवर आरोप करताच सत्यजित तांबे संतापले; थेट फेसबुक पोस्ट,पण कमेंट्स ऑफ
कोइलकोंडा मंडळात 1.10 एकर शेतजमीनही आढळली
ACB च्या प्राथमिक तपासात महबूबनगर जिल्ह्यातील जडचेरला येथे 283.11 चौरस यार्ड आणि जंगाव जिल्ह्यातील पालकुर्थी येथे 424 चौरस यार्डचे दोन भूखंड आढळले आहेत. या दोन्ही भूखंडांची सरकारी किंमत 87.67 लाख रुपये आहे. याशिवाय अटापूर येथे 63 लाख रुपये किमतीचा निवासी फ्लॅट आणि सुमारे 2.45 कोटी रुपये किमतीची G+2 निवासी इमारत आढळली आहे. महबूबनगर जिल्ह्यातील कोइलकोंडा मंडळात 1.10 एकर शेतजमीनही आढळली असून तिची किंमत 29.70 लाख रुपये आहे. या मालमत्तांचे मूल्यांकन सरकारी दरानुसार करण्यात आले आहे. प्रत्यक्ष बाजारमूल्य यापेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्याने त्यासंबंधीची कागदपत्रे आणि व्यवहारांची तपासणी सुरू आहे. छाप्यादरम्यान 5.47 लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. महबूबनगरमधील तुलजा भवानी वाइन्स या व्यवसायात 50 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या नावावर 1.30 कोटी रुपयांचे शेअर्स आणि बँक खात्यांमध्ये 7.97 लाख रुपये असल्याचे तपासात आढळले.
गुंडू वाणी यांच्याकडे 175.1 ग्रॅम सोन्याचे दागिनेही आढळले असून त्यांची किंमत सुमारे 2.54 लाख रुपये आहे. महिंद्रा XUV700 आणि हुंदाई क्रेटासह अनेक वाहनांची माहिती मिळाली असून त्यांची एकूण किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे. घरातील वस्तू आणि इतर साहित्याचे मूल्यांकन 5.10 लाख रुपये करण्यात आले आहे. ACB ने केलेल्या प्राथमिक मूल्यांकनानुसार गुंडू वाणी यांच्याकडे एकूण 6 कोटी 76 लाख 45 हजार 738 रुपयांची मालमत्ता आढळली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 मधील कलम 13 (1) (b) आणि 13 (2) अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर 2026 रोजी एका लाच प्रकरणातही त्यांना अटक झाली होती. मोईनाबाद नगरपालिका कार्यालयात कार्यरत असताना पंचायत सचिवामार्फत 75 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आणि स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात अटकेनंतर त्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आता उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याने ACB कडून दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. मालमत्तेची कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि संपत्तीच्या स्रोतांची पडताळणी केली जात आहे. पुढील तपासात मालमत्तेचे मूल्य वाढण्याची शक्यताही ACB ने व्यक्त केली आहे.
