रोहित पवारांनी फडणवीसांवर आरोप करताच सत्यजित तांबे संतापले; थेट फेसबुक पोस्ट,पण कमेंट्स ऑफ
Satyajeet Tambe on Rohit Pawar : आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर आमदार सत्यजित तांबे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी फेसबुकवर याबाबत सविस्तर लिहून पोस्ट केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रोहित पवारांनी फडणवीसांवर आरोप करताच सत्यजित तांबे संतापले
थेट फेसबुक पोस्ट,पण कमेंट्स ऑफ
Satyajeet Tambe on Rohit Pawar : माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघातामागे असलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एक नेता करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी या आधी केला होता. दरम्यान, सोमवारी (दि.17) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी 'त्या' नेत्याचा फोटो दाखवत नाव जाहीर केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच VRS कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप रोहित पवार यांनी केला. दरम्यान, रोहित पवारांच्या या आरोपानंतर आमदार सत्यजित तांबे चांगलेच संतापलेत. त्यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहित रोहित पवारांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. ते काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात.. मात्र, ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळाने त्यांनी कमेंट्स सेक्शन ऑफ केल्याचं पाहायला मिळालं.
सत्यजित तांबे यांची पोस्ट जशीच्या तशी
आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं.
अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही.
शेवटी आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी आहोत. राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात. त्या असणं अजिबात चुकीचं नाही. तुम्हाला आहेत, तशाच आम्हालाही आहेत आणि राज्यातील प्रत्येक तरुण नेत्याला असतील. मात्र, या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही, याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
म्हणूनच, एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडं सबुरीने घ्या. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात. त्यामुळे स्वतःच्या राजकीय प्रवासात अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्या. हा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या राजकीय भविष्यासाठी दिलेला एक मित्रत्वाचा सल्ला आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, समजदार आहात आणि राजकारणाचा अनुभवही तुम्हाला आहे. त्यामुळे यापुढे काय बोलावं आणि काय बोलू नये, हे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि शेवटी, एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल, तर असे अनेक फोटो अनेक राजकीय नेत्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे, आज समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढण्याचा किंवा कुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. या विषयावर अधिक भाष्य न केलेलंच बरं.
