प्रेमाचा डाव अन् पतीचा घात! सहा महिन्यांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट; धाराशिवमध्ये खळबळ
धाराशिवमध्ये एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीने काढला पतीचा काटा
प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने हत्या
Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात प्रेमसंबंधातून पतीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पतीची निर्घृण हत्या केली. गोविंद शिवाजी कागदे (वय 27, रा. गोलेगाव, ता. वाशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (19 नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रामकुंड शिवारातील कुंथलगिरी डोंगर परिसरात ही घटना घडली. अंजली कागदे आणि तिचा प्रियकर शुभम सुभाष खोसे यांनी गोविंद यांना चर्चेच्या बहाण्याने डोंगराळ भागात बोलावले. तेथे धारदार शस्त्राने वार केल्यानंतर डोक्यावर दगडाने प्रहार करून त्यांची हत्या करण्यात आली.
सहा महिन्यांपूर्वी लग्न अन् प्रेमसंबंध
गोविंद यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी अंजली चौधरी हिच्याशी विवाह झाला होता. अंजली ही गोलेगाव येथील गोविंद यांच्या आत्याची मुलगी आहे. मात्र, अंजलीचे तिच्याच दुसऱ्या आत्याचा मुलगा शुभम सुभाष खोसे (रा. चांदवड) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तिचा विवाह गोविंद यांच्याशी झाल्याने या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे गोविंद यांना संपवण्याचा कट अंजली आणि शुभम यांनी रचल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार दोघांनी त्यांना चर्चेसाठी कुंथलगिरी डोंगर परिसरात बोलावून घेतले आणि निर्घृणपणे हत्या केली.
हे ही वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणूक : भाजपचा छोट्या भावांनी गेम केला, पडद्याआड काय घडलं?
चर्चेच्या बहाण्याने बोलावून घेतलं अन्...
हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी गोविंद यांचा मृतदेह डोंगराच्या उतारावरील चारीत फेकून दिला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अंजली आणि शुभम यांचा पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून गोळीबार, अहिल्यानगर फायरिंग प्रकरणातील आरोपी कोल्हापुरात कसे पोहोचले?
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणी गोविंद यांचे चुलत भाऊ ज्ञानेश्वर बाजीराव कागदे यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अंजली गोविंद कागदे आणि शुभम सुभाष खोसे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून पुरावे गोळा केले असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
